नागपूर- महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात येणाऱ्या नव्या कोविड रुग्णालयाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. ज्याविरुद्ध स्थानिकांनी विरोध आंदोलन केले.नागरिकांच्या समर्थानात स्थानिक काँग्रेस आमदार विकास ठाकरे उतरले होते. विकास ठाकरे यांनीही नागरिकांच्या मागणीला समर्थन दर्शवत नागपूर महापालिकेचे प्रस्तावित कोविड रुग्णालय तेथून इतरत्र हलवण्याची मागणी केली.
नागपूरच्या काटोल रोडवरील केटी नगर परिसरात महापालिकेचे 105 खाटांचे कोव्हिड रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. पुढील 2 आठवड्यात हे रुग्णालय कार्यान्वित करण्यात येण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही बहुमजली इमारत गेल्या 14 वर्षांपासून बनून तयार आहे. गेल्या 2 वर्षांपासून एसआरए (झोपडपट्टी पुनवर्सन) च्या कार्यालयासाठी वापरण्यात येते. परंतु, शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या इमारतीचा वापर महापालिकेच्या कोविड रुग्णालयासाठी करण्याचे योजिले आहे.
कोविड रुग्णालयाची प्रस्तावित इमारत ही दोन रहिवाशी इमारतीच्या मध्ये असून दोन्ही इमारतीत सुमारे पाचशे कुटुंब राहतात. रुग्णालयाची इमारात व त्याजवळच्या दोन्ही रहिवासी इमारती मध्ये अवघ्या काही फुटांचे अंतर आहे. सोबतच रुग्णालयाच्या समोरच्या इमारतीच्या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण या दाट लोकसंख्येच्या परिसरात आल्यास परिसरातील इतर नागरिकांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी आज त्याविरुद्ध आंदोलन केले.
कोव्हिड रुग्णालय महापालिकेने रहिवासी वस्तीपासून दूर इतर ठिकाणी हलवण्याची मागणी नागरिकांनी केली. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर महापालिका काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.