नागपूर - मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गुपचूप पद्धतीने चरस पुरवणाऱ्या एका कर्मचाऱ्यांला रंगेहात पकडण्यात आले आहे. मंगेश सोळंकी, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला २७ ग्रॅम चरस घेऊन जाताना कारागृह अधीक्षकांनी पडकले.
कारागृह अधीक्षकांना होता संशय -
कारागृह कर्मचारी मंगेश आणि इतर चार सुरक्षा रक्षक कारागृहात कर्तव्यावर हजर होत असताना अधीक्षकांनी त्यांची झडती घेतली. त्यावेळी मंगेशच्या सॉक्समध्ये दोन पुड्या सापडल्या. त्यामध्ये चरस असल्याचे निष्पन्न झाले. कुणालाही संशय येऊ नये, म्हणून मंगेशने चरस सॉक्समध्ये लपवून ठेवले होते. कारागृहातील कर्मचारीच कैद्यांना अमली पदार्थ पुरवत असल्याने कारागृह अधीक्षकांनी मंगेश सोळंकीला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
तीन हजार रुपयांत झाली डील -
नागपूर मध्यवर्ती कारागृहात गोपी नावाचा एक गुंड बंद आहे. त्याला चरसचे व्यसन असल्याने त्याने मंगेशशी संपर्क साधला. बाहेरून चरस आतमध्ये आणण्यासाठी तीन हजार रुपयांमध्ये सौदा पक्का झाला होता. मात्र, कारागृह अधीक्षकांना गेल्या काही दिवसांपासून मंगेशवर संशय होता. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ २७ ग्रॅम चरस आढळले. नागपूर मध्यवर्ती कारागृहात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची ही पहिली घटना नाही. या अगोदरही कैद्यांकडून चरस, गांजासह मोबाईल फोन जप्त करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणामुळे कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.