नागपूर- श्री गुरू नानक देव यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने पाकिस्तान येथील गुरूद्वारा श्री ननकाना साहिब येथून नगर किर्तन निघाले होते. त्याचे आज नागपूर येथील झिरो माईल या ठिकाणी रात्री उशिरा जल्लोषात आगमन झाले. या यात्रेत समाविष्ठ असलेल्या भाविकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कामठी मार्गावर असलेल्या गुरूद्वारामध्ये करण्यात आली आहे.
शिखांचे पहिले धर्मगुरू श्री गुरूनानक देव यांचा प्रकाश पर्व येत्या १२ नोव्हेंबरला होणार आहे. मात्र या वर्षी त्यांची ५५० वी जयंती असल्याने शीख बांधवांकडून संपूर्ण वर्षभरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरू नानक देव यांनी सदैव मानवतेची शिकवण दिली. त्यांच्या विचारांना लोकांनी आत्मसात करावे या हेतूने शीख समाजाकडून ही आंतरराष्ट्रीय जागृती यात्रा काढण्यात आली आहे.
सध्या ही यात्रा महाराष्ट्राच्या विदर्भात दाखल झाली आहे. तिचे आज उशिरा रात्री नागपुरात आगमन झाले. पाकिस्तानच्या ननकाना साहिब येथून निघालेल्या या नगर किर्तन यात्रेमध्ये जवळपास २०० शीख लोकांचा समावेश आहे. आज रात्री नागपुरात आराम केल्यानंतर उद्या हे नगर किर्तन निजामाबादसाठी निघणार आहे, अशी माहिती गुरूद्वारा कमेटीकडून देण्यात आली आहे.