नागपूर - वाढत्या शहरीकरणामुळे नागपूर शहराचे वैभव असलेल्या नाग, पिवळी आणि पोहरा या तिन्ही नद्यांचे पाणी प्रदूषित झाले आहे. महत्वाचे म्हणजे कधीकाळी शहरातून वाहणाऱ्या या नद्यांना दुर्दैवाने आता नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील सर्व घाण, सांडपाणी आणि कचरा नाग नदीत वाहून जात असल्याने आजच्या पिढीला नाग नदीचे महत्वच समजलेले नाही. मात्र, पावसाळा सुरू होण्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेने केलेल्या नाले सफाईत या तिन्ही नद्यांना मूळ स्वरूप प्राप्त झाले आहे.
नागपूर शहराचे वैभव असलेली ऐतिहासिक नाग नदी खऱ्या अर्थाने नागपूरवासीयांची ओळख आहे. मात्र, निसर्गाने दिलेला हा वारसा नागरिकांच्या दुर्लक्षामुळे त्याची ओळख नाहीशी होऊ लागली होती. शहराची ओळख असलेल्या या नद्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या काही वर्षांपासून नाग नदीला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. यामध्ये शहरातील सर्व घाण, कचरा, सांडपाणी सोडले जात होते. या नद्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण देखील वाढले आहे. त्यामुळे या नद्यांची ओळख पुसली जात आहे. या नद्यांमधून दुर्गंधी येत असल्याने आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा या तिन्ही नद्यांची स्वच्छता केली जाते. मात्र, यंदा नद्यांच्या खोलीकरणासह रुंदीकरण करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या तिन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाचा विडा उचलला आहे. नदीतून काढलेला गाळ नदीच्या संरक्षण भिंतीला लावून न ठेवता दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यात आला. त्यामुळे नदीचा प्रवाह मोकळा झाला असून नद्या कधी नव्हे इतक्या खळाखळून वाहू लागल्या आहेत. नदीतून काढलेला गाळ परत त्याच नदीत वाहून जाणार नसल्याने यंदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. एकंदरीतच महापालिकेने शहरांच्या या धमन्यांना पुन्हा नद्याचे स्वरुप देण्याचे काम केले आहे. नियोजनबद्ध स्वच्छतेमुळे आज या तिन्ही नद्या मूळ स्वरुपात येत आहेत. त्यामुळे नागपूरला गतवैभव तर मिळालेच. शिवाय या वैभवात भरही पडली आहे.
पिवळी नदीची लांबी १६.७ किमी आहे. या नदीचा सर्व परिसर स्वच्छ झाला आहे. ही नदी गोरेवाडा-मानकापूर स्टेडियम-कामठी रोड-जुना कामठी रोड नाक्यापासून पुढ नदीच्या संगमापर्यंत वाहत जाते. तसेच पोहरा नदी शंकर नगर-नरेंद्र नगर-पिपळा फाटा-नरसाळा-विहिरगाव, अशी वाहते. या नदीची लांबी १३.२० किमी आहे. सद्यस्थितीत या नदीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नद्यांची आता गाळ काढून व रुंदीकरण करून स्वच्छता केली आहे. तसेच नागनदीचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने देखील काम सुरू झाले आहे. लवकरच आपलल्या नाग नदीचे स्वच्छ पाणी खळखळ वाहताना दिसेल. याप्रकारे नियोजत सुरू आहे. भविष्यात नागनदीच्या किनाऱ्यावर बागीचे तयार होतील. यामध्ये नागरिक व्यायाम, जॉगिंग करतील. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कृती सुरू झाली आहे. त्यातून पर्यटनाला बळ मिळेल, अशी आशा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली आहे.