नागपूर - पाचव्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक प्रकारच्या व्यापारी आस्थापना सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. परंतू, सलून व ब्युटी पार्लर उघडण्यास अजूनही मनाई आहे. ज्यामुळे या व्यवसायावर आर्थिक परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सर्व सलून व ब्युटी पार्लर उघडण्याची मागणी नाभिक संघटनेतर्फे करण्यात आली.
आज (शनिवार) नागपुरात नाभिक संघटनेतर्फे 'माझे दुकान-माझी मागणी' हे अभिनव आंदोलन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पहिल्या लॉकडाऊनपासूनच सलून व ब्युटी पार्लर दुकाने उघडण्यास बंदी करण्यात आली होती. ही बंदी आजही कायम आहे. परंतू, ही दुकाने गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने या दुकानांवर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचा व्यवसाय बुडाला असून, आर्थिक गणित पूर्णपणे विस्कटले आहे. त्यामुळे राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सलून दुकाने सुरू करण्यात यावी. सोबतच या व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज द्यावे, घरभाडे, दुकान भाडे, व विजेचे बिल माफ करावे, अशी मागणी नाभिक समाज संघटनेतर्फे करण्यात आली.