नागपूर - किरकोळ वादातून तीन आरोपींनी एका 60 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 19) रात्रीच्या सुमारास घडली. सम्हारू अवधू हरिजन, असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. दिनेशकुमार मुन्ना लाला, बजरंगी लालचंदप्रसाद गौतम आणि सुशीलकुमार दिपचंद गौतम, असे आरोपींची नावे आहेत. मृत व्यक्ती व आरोपी मेट्रोचा गांधीबाग साइटवर एकत्र कामाला असून एकत्रच राहत असल्याची माहिती पुढे आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य नगर परिसरात दिनेशकुमार मुन्ना लाला, बजरंगी लालचंदप्रसाद गौतम आणि सुशीलकुमार दिपचंद गौतम या तिघांना मृत सम्हारू अवधू हरिजन यांनी रात्र पाळीवर (नाईट ड्युटी) जाण्यास सांगितले. तेव्हा तिघांनी मनाई केल्याने सम्हारू यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या तिघांनी सम्हारूला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दिनेशकुमार मुन्ना लाला याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने सम्हारूवर वार केले ज्यामध्ये त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तीनही आरोपींना जबलपूरला पळून जाताना अटक
घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध सुरू केला. मात्र, आरोपी पळून गेल्याने पोलिसांनी रात्रभर त्यांचा शोध घेण्याची मोहीम राबवली असता आरोपी जबलपूरला पळून जात असल्याची माहिती समजताच पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा - अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या विरोधात यूथ काँग्रेसचे आंदोलन