नागपूर - महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज नागपुरातील विविध कोविड केअर सेंटरची पाहणी केली. सेंटरमधील सद्यस्थितीची माहिती घेऊन त्रुटींबाबत अधिकाऱ्यांना सुचनाही दिल्या. शहरातील तीन व आमदार निवासात असलेल्या कोविड सेंटरची पाहणीकरून मुंढेंनी रूग्णांसोबत संवादही साधला.
नागपूरात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील अधिक आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटरमुळे अधिक मदत मिळत आहे. या सेंटर्सवर काम करणारे कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यामुळे कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मुंढे यांनी अभिनंदन यावेळी केले.
कोविड टेस्टिंग सेंटरलादेखील आयुक्तांनी भेट दिली. या सेंटरमध्ये रूग्णांना सर्व सुविधा मिळत आहेत का? कर्मचारी कशा पद्धतीने काम करत आहेत, याचीही पाहणी मुंढेंनी केली. शहरातील २१ टेस्टिंग सेंटर्समुळे नागरिकांना व प्रशासनाला मोठी मदत मिळत आहे. त्यामुळे या सेंटर्सवर काही समस्या असेल तर त्या दूर करण्यासाठीच हा पाहणी दौरा असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. शहरातील कोरोना रूग्ण संख्येला आळा घालण्याचा सातत्याने प्रयत्न प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील सहकार्य करावे. कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास ते न लपवता नागरिकांनी स्वतः टेस्टिंग सेंटरला भेट देऊन तपासणी करावी, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.