नागपूर - शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येचे आकडे दिवसागणिक फुगत आहेत. मुंबईत धारावी, कोळीवाडा यासह इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी तज्ञांनी उपायोजना केल्या. या तज्ञांची चमू ४ सप्टेंबरला नागपूर शहरात येणार आहे. ही टीम विभागीय आयुक्त कार्यालय येथे भेट देवून दुपारी १२ वाजता नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
या टीममध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह डॉ. ओम श्रीवास्तव (संक्रमक रोग विशेषज्ञ), डॉ. राहुल पंडित (गंभीर रोग विशेषज्ञ), डॉ. मुफझल लकडावाला (जनरल सर्जन), डॉ. गौरव चतुर्वेदी (कान-नाक-घसा विशेषज्ञ ) यांच्यासह इतर तज्ञांचा समावेश आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
मुंबई येथील हॉटस्पॉट ठरलेल्या कोळीवाडा, धारावी व अन्य भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण निघत होते. परंतु आता येथील परिस्थिती अगदी सामान्य झाली आहे. मात्र, नागपूर शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्थानिक प्रशासन संक्रमण रोखण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अपेक्षित यश मिळत नसल्याने पदरी निराशाच पडत आहे. धारावी, कोळीवाडासह मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या अनुभवाचा लाभ घेवून नागपुरात काय उपाययोजना कराव्या लागतील यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुफझल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी नागपूर येथील कोरोनामुळे चिघळलेली परिस्थिती कशी हाताळायची यावर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.