नागपूर - शासन एकीकडे माता मृत्यू रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे. मात्र, शहरातील महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाला याची पर्वा नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयाच्या प्रसूती केंद्रातील भिंतींना शेवाळ लागली असून जंतू संसर्ग होऊन मातांचे जीव धोक्यात येण्याचे चित्र आहे.
सर्व शासकीय रुग्णालयात महिलांना सन्मानपूर्वक प्रसूती मिळणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाने या गोष्टींना बगल दिल्याचे दिसले आहे. रुग्णालयाच्या प्रसूती केंद्रातील भिंतींची अवस्था बिकट झाली आहे. भिंतींना शेवाळ लागले असून छतातून पाणी गळती होत आहे. अशा वातावरणात प्रसूतीसाठी आलेल्या मातांना जंतू संसर्ग होण्याचा धोका असतो. मात्र, मनपाचे आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करित असल्याचे निदर्शनास आले आहे.
७५ खाटांच्या या रुग्णालयातील ३० खाट स्त्री रोग व प्रसुती विभागासाठी राखीव आहेत. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातच प्रसूती कक्ष आहे. या विभागात महिन्याला १० च्या वर प्रसूती होतात. मात्र, शासकीय आरोग्य सेवेचे सर्व नियम धाब्यावर बसवून इथे प्रसूती होत असल्याने रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.