नागपूर - स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी आतापर्यंत नागपुरातून एसटी बसच्या सुमारे सहाशे फेऱ्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून सुमारे बारा हजार प्रवाशांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले आहे. देशात असलेल्या कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजूर व नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी बसेसच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात येत आहे. त्यानुसार नागपूरच्या गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकांतून एसटीच्या दररोज ६५ ते ७० फेऱ्या होत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून एसटीचे हे कार्य मोफत सुरू असून प्रवाशांची आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे.
प्रवाशांसाठी नाश्ता आणि भोजनाची सोयदेखील स्वयंसेवी संस्थांतर्फे करण्यात येत आहे. सोबतच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन करून प्रवाशांना गावी जाण्यासाठी सोडण्यात येत आहे.