नागपूर - मान्सूनचे विदर्भात आगमन झाले असल्याची घोषणा नागपूर वेध शाळेने केली आहे. विदर्भातील वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात मान्सूनचे अगदी वेळेवर आगमन झाले. मान्सून पूर्व विदर्भ मार्गे दाखल झाला असला, तरी पुढील काही तासात तो संपूर्ण विदर्भ व्यापून टाकेल, अशी माहिती हवामान विभागाचे संचालक एम. एल. शाहू यांनी दिली. मान्सूनच्या आगमनासोबतच वेध शाळेने पुढील तीन दिवसात विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे.