नागपूर- शहरातील नारायण पेठ परिसरात सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त लोकांनी गुंडाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. विजय वागधरे असे मृतक गुंडाचे नाव आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शांतीनगर भागात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.
सततच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल
ही घटना रात्रीच्या सुमारास शांती नगर मधील नारायण पेठ येथे सुनील नावाच्या इसमासोबत मृतक विजय काल (रविवार) दुपार पासून वाद घालत होता. त्यामुळे सुनील आणि त्याचे भाऊ विजयची तक्रार देण्यासाठी शांतीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंदोबस्तात तैनात असल्याने पोलिसांनी विजयवर कारवाई केली नाही. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा मृतक विजयने सुनीलच्या घरासमोर गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे सुनील आणि विजयमध्ये वादावादी सुरू झाली. तेव्हा गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून नारायण पेठ परिसरातील संतप्त नागरिकांनी विजयला मारहाण करत दगडफेक केली. या मारहाणीत विजयचा मृत्यू झाला.
३ जण ताब्यात
घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून बाकी आरोपींचा शोध सुरु आहे.
या आगोदरही एका गुंडाची जमावाकडून हत्या
१३ ऑगस्ट २००४ साली नागपूरात अक्कु यादव नामक गुंडाची संतप्त जमावाने अश्याच प्रकारे खून केला होता. ज्यावेळी पोलीस अक्कु यादव ला न्यायालयात घेऊन जात होते. त्यावेळी दोनशेपेक्षा जास्त महिलांनी त्याच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.