नागपूर - शासकीय रुग्णालयाची जबाबदारी सरकारची आहे. पण खासगी रुग्णालयाची परिस्थिती पाहता यावर खासगी रुग्णाल्याच्या ऑडिटची जबाबदारी त्या त्या स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिली आहे. पण मागील काही दिवस कोरोनाच्या संकटाला प्राधान्य असल्यामुळे ऑडिटचे काम थांबलेले आहे. आज सर्वांचे लक्ष लोकांचा जीव वाचवण्याकडे आहे. विरारसारख्या अशा घटना होऊ नये. ही अत्यंत दुर्दैवी घटना झाली असल्याची भावना मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
विरार पश्चिम येथील विजय वल्लभ कोविड केअर रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली. यात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अशा घटना होऊ नये यासाठी एक नियमावली बनवत आहे. या नियमावलीचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. खासगी रुग्णालयाने नियमावलीचे पालन करावे, असे आदेश देतो आहेत. या नियमावलीचे पालन होणार नसेल तर त्या रुग्णलयाची मान्यता रद्द करण्याची सुद्धा पावले गरज पडल्यास उचलावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आंतरजिल्हा बंदी घातली आहे. यात लॉकडाऊन कडक केला आहे. पण लॉकडाऊनचेही पालन करणार नसतील तर कोण जीव वाचवू शकेल? हा प्रश्न असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. पोलिसांनी करवाई सुरू केली आहे. बाहेर जिल्ह्यातील येणारा ताण कमी केला आहे. पण या सर्वाला मर्यादा आहेत आणि लॉकडाऊन हा यातील सर्वोत्तम पर्याय आहे, असेही त्यांनी म्हटले.