नागपूर - पोल्ट्री फार्म असणा-यांना आपत्ती काळात होणा-या नुकसानीबाबत योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय पशुसंवर्धन व डेयरी मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे भेट घेऊन केली.
बर्ड फ्लु आणि अन्य साथीच्या रोगामुळे एकाच वेळी अनेक कोबडयांना माराव्या लागल्या आहे. यामुळे पोल्ट्री मालकाचे अतोनात नुकसान होते. अशा वेळी केंद्र व राज्य शासन मिळून काही मदत पोल्ट्री फार्म मालकांना दिली जाते. पण मागील 15 वर्षापासून केंद्र आणि राज्य मिळून प्रत्येक कोबडयामागे 45:45 रूपये अशी मदत कायम आहे. यात आजची परिस्थिती पाहता ही मदत अपुरी पडत आहे. यामुळे ही आर्थिक मदत वाढवून किमान प्रत्येकी 100:100 रूपये असावी, अशी मागणी महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्र्यांपुढे केली.
भारतीय गीर जातीच्या गायीवर ब्राझीलमध्ये संशोधन
भारतीय गीर जातीच्या गायीवर ब्राझीलमध्ये संशोधन होऊन अधीक दुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकरीत गीर गाय दिवसाला 25-27 लीटर दूध देते. या गीर जातीच्या गायी भारतात आणुन शेतक-यांना द्याव्यात जेणेकरून शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून असणा-या दुग्ध व्यवसायाला भरभराट येईल. अशी माहिती देत या गीर गायी देशात आणण्याची मागणी सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.
यासोबतच सानेन या जातीच्या बक-या ज्या दिवसाला 10-12 लीटर दूध देतात. त्यांना देशात आणाव्या जेणेकरून भारतीय लोकांना या बक-यांच्या दुधातून रोजगार वाढीसाठी मदत होईल, अशी मागणीही केदार यांनी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे केली. या बकरीचे संकर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनेडा, इजराईल येथे मोठया प्रमाणात आहेत.
…यामुळे दुधापासून लोणी बनविणा-यांना नुकसान
दुध आणि भाजीपाल्यापासून बनविण्यात येणा-या लोणीचा फरक समजण्यासाठी दोघांचा रंग वेगवेगळा असावा, अशी मागणीही सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली. दूधापासून तयार होणाऱ्या लोणीच्या तुलनेत भाजीपाल्यांपासून तयार करण्यात येणा-या लोणीला कमी गुंतवणूक लागते. मात्र, बाजारात आल्यावर दोघांची किमत सारखी असते. यामुळे दुधापासून लोणी बनविणा-यांना नुकसान होते. यासाठी दोन्ही लोणींचा रंग वेगळा असावा. यासह ग्राहकांनी कोणता लोणी खरेदी केले आहे हे कळण्यासाठी दोघांतील फरक स्पष्ट दिसावा. करिता लोणीचा रंग वेगळा ठेवण्याची, विंनती पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी केली.