नागपूर: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमडळ विस्तार कधी होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रीमडळ विस्ताराबाबत सूचक वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार योग्य क्षणी होईल. अडीच वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो. आम्ही कोणीही मंत्री नव्हतो. तेव्हाही राज्याचे प्रश्न घेऊन आम्ही लढत होतो, लोकांचे प्रश्न सोडवत होतो, मंत्रिमंडळाचा विस्तार काही कारणामुळे थांबला असला तरी योग्य वेळी विस्तार होईल, असे मंत्री मुनंगटीवार म्हणाले आहेत. ते नागपूरात पत्रकरांसोबत बोलत होते.
राजकारणातल्या वाघांचे योग्य स्थलांतर: मंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, वाघांचे योग्य ठिकाणी स्थलांतरण करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मग तो वाघ जंगलातला असो किंवा राजकारणातला असो, चाळीस वाघांचे स्थलांतरण तर आम्ही योग्य ठिकाणी केले आहे, उर्वरित जखमी वाघांसाठी आम्ही रेस्क्यू सेंटर उभारत आहोत. तिथे त्यांचा योग्य उपचार केला जाईल.
पक्ष वडिलोपार्जित संपत्ती नाही: मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, बहुमत वडिलोपार्जित संपत्ती नाही. आमच्या पित्याने पक्ष काढला म्हणजे आमचा अधिकार आहे, उर्वरित दोन भावांचा अधिकार नाही का? इतर ठाकरे कुटुंबीय शिंदे गटात आहेत. मग बाळासाहेबांचा वारसा चालवणारे दोन तृतीयांश ठाकरे शिंदे गटात आहेत. शिवसेना असे नाव तुम्ही ठेवले आहे, छत्रपतींचे नाव तुम्ही वापरले आहे, मग तर त्यांचे वंशज अध्यक्ष राहिले पाहिजे होते ना?, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांना गैरसमज: मंत्री मुनंगटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे असा गैरसमज का करून घेतात की तुमच्या नावानेच लोक निवडून येतात. मग फक्त 56 मतदारसंघात तुमचे नाव चालते अन् इतर ठिकाणी तुमचे नाव चालत नाही का. जो कसेल त्याची जमीन, तसेच जो काम करेल त्याचा पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला पक्ष बांधलेल्यांचा पक्ष होईल का?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
राऊतांचे आरोप तपासले पाहिजे: खासदार संजय राऊतांनी केलेल्या आरोप मंत्री मुनंगटीवार म्हणाले की, संजय राऊत यांच्या धमकीचा प्रकरण गंभीर आहे की नाही, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. या प्रकरणांमध्ये सत्यता आहे की नाही याचाही तपास झाला पाहिजे. अन्यथा एक नवीन फॅशन सुरू होईल. आरोप करायचा आणि मात्र, आरोपासंदर्भात माहितीचा स्त्रोत सांगायचा नाही. संजय राऊतांकडे जी माहिती असेल ती पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतली पाहिजे.
सुरक्षा कायम ठेवण्याचा प्रयत्न: अशोक चव्हाण त्यांचा घात होईल असे सांगून मिळालेली सुरक्षा कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न मंत्री मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. अशोक चव्हाण यांच्या तक्रारी बद्दल पोलिसांनी चौकशी करावी तसेच पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तपासाची माहिती लोकांपर्यंत द्यावी. पुढे अशा प्रकरणाच्या तपासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही व लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो. लोकप्रतिनिधी यांच्याच जीवाला धोका आहे, असे वातावरण निर्माण झाले तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात.
कसबा व चिंचवड पोटनिवडणूक: पोटनिवडणूकीबाबत ते म्हणाले की, निवडणुकीमध्ये प्रत्येकच पक्ष आणि उमेदवार गांभीर्याने घेतो. निवडणूक हास्य जत्रा नाही. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आम्ही मित्र पक्षांसोबत अगदी गांभीर्याने लढत आहोत. महाविकास आघाडी पण गांभीर्याने लढत आहे. जनता कोणाला आशीर्वाद देईल हे जनताच ठरवेल. मात्र, मला विश्वास आहे की मतदारसंघात वेगाने काम करण्यासाठी जनता भाजप-शिवसेनेला आशीर्वाद देणार आहे.
मध्यस्थीवर शंका: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणात शरद पवारांनी रात्री काय मध्यस्थी केली हे मला माहीत नाही. असे ही होऊ शकतो ते विद्यार्थी त्यांच्या संपर्कातीलच असतील, असे अनेकदा होते. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनुमती घेऊनच मी अनुपस्थित आहे. काही पूर्व नियोजित कार्यक्रम विदर्भात होते. म्हणून मी आलो असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
दोषींवर कारवाई होणार: गायक सोनू निगम धक्काबुक्की प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात गृह विभाग चौकशी करत आहे. या तपासात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे मंत्री मुनंगटीवार म्हणाले.