नागपूर - नागपूर मनपाकडून ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन'ची सुरुवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौकातील ग्लोकल स्क्वेअर मॉलमध्ये नागरिकांसाठी 'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन'चा शुभारंभ झाला आहे.
आधार कार्ड, पॅनकार्ड लसीकरणासाठी आवश्यक
'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन'द्वारे ६० वर्षावरील नागरिकांना त्यांच्या वाहनामध्ये कोविशिल्ड लस दिली जात आहे. यासाठी पात्र नागरिकांनी घरातील व्यक्तींबरोबर लसीकरण केंद्रावर आपले आधार कार्ड किंवा पॅनकार्ड सोबत घेऊन जावे. नोंदणी झाल्यानंतर ज्येष्ठांना त्यांच्याच वाहनामध्ये लस दिली जाते. यानंतर काही वेळ देखरेखीत ठेवून आवश्यक औषधे देऊन नागरिकांना घरी पाठविण्यात येत आहे.
वयोवृद्धांची रांगेतून मुक्तता
शहरातील लसीकरण मोहिमेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी वेगळी व्यवस्था असावी, याबाबत ज्येष्ठ नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे. 60 वर्षावरील वयोवृद्ध नागरिक हे लसीकरण केंद्रावर गर्दीत तासन तास प्रतीक्षा करणे शक्य नाही. यामुळे या ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन' हा सोयीचा उपक्रम ठरत आहे. यात घरातून स्वत:च्या वाहनात बसून लसीकरण केंद्रावर यावे, वाहनातच लस दिल्या जाणार आहे. त्यामुळे वयोवृध्दांची रांगेतून सुटका होणार आहे.
हेही वाचा -केंद्र सरकारने कोणत्या राज्याला किती ऑक्सिजनचा पुरवठा केला, याची माहिती जाहीर करावी - अजित पवार