नागपूर - प्रखर ऊन आणि तापमानाचा पारा वर चढत असताना आज (गुरुवारी) अचानक नागपुरात पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने देखील नागपुरासह विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल निर्माण झाला आहे. या पावसाचा मात्र राहुल गांधींच्या आजच्या सभेला फायदा होणार असल्याची चर्चा नागपुरात रंगली आहे.
नागपुरात सध्या राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे आज झालेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ४३ अंश सेल्सिअस तापमानाचा पल्ला गाठल्यामुळे सर्वसामान्यांचे गर्मीमुळे हाल होऊ लागले होते.
आज नागपुरात राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे पावसाचे जरी अचानक आगमन झालेले असले, तरीही तापमान कमी झाल्याचा फायदाच या सभेला होण्याची शक्यता आहे.