नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यापीठामाजी सिनेट सदस्य मोहन वाजपेयी यांनी प्रशांत कडू यांच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. या प्रकरणात सुनवाई सुरू असून न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारीसह विद्यापीठाच्या कुलगुरूंना नोटीस पाठवली आहे. नोटीसला दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पदमुक्त होण्याची इच्छा: भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पदाचा भार स्वीकारल्यापासून वादाने त्यांची पाठ सोडलीच नाही. आक्षेपार्ह आणि वादग्रस्त भूमिकांमुळे ते नेहमीच विरोधकांच्या टार्गेटवर राहिले आहेत. रोज नवनवीन वाद उद्भवत असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालवण्याचा मानस त्यांचा आहे.
राज्यपाल आणि वाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील केलेल्या वादग्रस्त वक्त्यामुळे विरोधकांनी अक्षरशः रान उठवले होते. त्या आधीपासूनच विरोधकांकडून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. याशिवाय सावित्रीबाईंविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केल्यामुळे ते विरोधकांच्या टार्गेटवर आले होते.
जनसंवाद विद्या विभाग आणि वाद : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जनसंवाद विद्या विभागात (मास कम्युनिकेशन) कार्यरत वादग्रस्त प्राध्यापकाने विद्यापीठातील विविध विभागात कार्यरत सात प्राध्यापकांना लैंगिक शोषणाच्या खोट्या तक्रारींच्या आधारे फसवण्याची बाब उघडकीस आली होती. सातही प्राध्यापकांना भीती दाखवून तब्बल 16 लाख रुपये खंडणी स्वरूपात वसूल केल्याचे प्रकरण उजेडात आले होते. धर्मेश धावनकर असे प्राध्यापकाचे नाव असून त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या जनसंपर्क विभाग प्रमुख पदाची जबाबदारी देखील होती.
या प्राध्याकांची केली फसवणूक : या प्रकरणाचा वाचा फुटल्यानंतर कुलगुरू सुभाष चौधरी यांनी प्राध्यापक धर्मेश धावनकरकडून पीआरओ पदाची जबाबदारी काढून घेतली असून नोटीस बजावली आहे. 16 नोव्हेंबर पर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या सात प्राध्यापकांनी धर्मेश धावनकर यांच्या विरोधात तक्रार केली आहे त्यांच्यामध्ये लोक प्रशासन विभागाचे प्रमुख जितेंद्र वासनिक, प्रवास पर्यटन विभागाचे प्रभारी डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक बोरकर, ग्रंथालय शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सत्यप्रकाश निकोसे, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सत्यप्रकाश इंदूरवाडे, जीवनरसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. वीरेंद्र मेश्राम आणि मराठी विभागाचे डॉ. शैलेंद्र लेंडे यांचा समावेश होता. सातही प्राध्यापकांनी कुलगुरू, राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे प्राध्यापक धर्मेश धवनकरच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.