नागपूर Marbat Festival 2023 : सामाजिक महत्त्व असलेला बडग्या मारबत महोत्सव नागपूरकरांच्या अभूतपूर्व उत्साहपूर्ण वातावरणात (Badgya Marabat Festival) साजरा झाला. मुसळधार पावसात देखील नागपूरकरांनी बडग्या मारबत उत्सवात अक्षरशः आनंदाची उधळण केली. काळी आणि पिवळी मारबतची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
१४३ वर्षांपासून परंपरा : जगप्रसिद्ध तसंच ऐतिहासिक, धार्मिक परंपरेची जोड असलेला बडग्यामारबत उत्सवाचं नागपूर येथे आयोजन करण्यात आलं होतं. बडग्या-मारबत जगातला एकमेव असा उत्सव आहे जो केवळ नागपुरात साजरा केला जातो. ही परंपरा गेल्या १४३ वर्षांपासून अविरतपणे नागपूरकरांनी जपलेली आहे. पोळ्याच्या पाडव्याला बडग्या-मारबत उत्सवाचे आयोजन केले जाते. लाखोंच्या संख्येनं नागपूरकर या उत्सवात सहभागी झाले होते. मात्र, शेजारच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातील नागरिक देखील ऐतिहासिक उत्सव बघण्यासाठी आले होते.
इडा-पिडा,रोग राई घेऊन जागे मारबत : समाजातील वाईट परंपरा, रोगराई, संकट यासह वाईट प्रवृत्ती समाजातून नष्ट व्हाव्यात व चांगल्या गोष्टींचे स्वागत केले जावे, यासाठी मारबतची मिरवणूक काढली जाते. गेल्या १४३ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. या मिरवणुकीत इडा-पिडा, रोग राई, जादूटोना घेऊन जागे मारबत अशा घोषणा देण्यात आल्या.
मूळ परंपरा आदिवासी समाजाची : ही ऐतिहासिक परंपरा मूळ आदिवासींची आहे. नागपुरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली. पोळ्याच्या पाडव्याला लहान-लहान मुलं गल्ली बोळांतून, 'इडा-पिडा घेऊन जा रे मारबत घेऊन जा गे मारबत' असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबत बरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते.
मारबत व बडग्या मिरवणुकी मागचा इतिहास : भोसले घराण्यातील बांकाबाई हिने इग्रजांशी हातमिळवणी केली होती. त्याचा निषेध म्हणून बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळ्याची, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते. यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बाकांबाईच्या नवऱ्याने पण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही, म्हणून त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणूक काढतात. बकाबाईच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या असे म्हणतात.
काळी आणि पिवळ्या मारबतीचे महत्त्व : काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत. महाभारत काळाचा संदर्भदेखील या उत्सवाला दिला जातो. श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीला प्राचीन काळी मारबत आणि लोकांचे रक्षण करणारी पिवळी मारबत अशा दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात, असाही इतिहास काही जण सांगतात. इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षा देखील जुना उत्सव मारबत आहे. प्राचीन काळात अनेक रुढी परंपरा होत्या, ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचे प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत असंही म्हटलं जातं.
हेही वाचा -
Marbat Festival नागपुरात मारबत महोत्सव साजरा, राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर खोचक टोमणे