नागपूर Marbat Festival 2023 : भारतात केवळ नागपुरातचं जगप्रसिद्ध बडग्या-मारबत उत्सव (Marbat Festival) साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. या परंपरेला यावर्षी १४३ वर्ष पूर्ण झाली आहेत. नागपूरकरांना वर्षभर या मारबत उत्सवाच्या मिरवणुकीची प्रतीक्षा लागलेली असते. उत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बडगे देखील आहे.
बडग्यांचे अनन्यसाधारण महत्त्व : वर्षभर घडणाऱ्या घटना ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना ज्यांचा संबंध नागरिकांच्या जगण्यावर होतो. अशा विषयांवर मार्मिक टीका करत सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे देखावे आणि प्रतिकात्मक पुतळे मिरवणुकीत सहभागी होतात. त्याला बडगे असं म्हणतात. या बेधडक बडग्यांच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी परंपरांवर प्रहार केला जातो. त्याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांचे कान देखील टोचले जातात, त्यामुळे मारबत उत्सवात या बडग्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महत्त्वाचे आणि लक्षवेधक बडगे : मारबत उत्सव (Marbat Festival) म्हंटला तर बडग्यांची चर्चा तर ही होणारचं. मारबत उत्सवातील सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधक घटक म्हणून या बडग्यांकडे बघितले जाते. काळी पिवळी मारबतींच्या मागे पुढे मिरवणारे पुतळे म्हणजे बडगे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवर भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींतून बडग्यांच्या माध्यमाने जनतेच्या मनातल्या प्रश्नासह विरोधाचा राग आणि संताप व्यक्त केला जातो. यावर्षी कोणत्या विषयांवर बडगे निघतील याकडे संपूर्ण नागपूरकरांचं विशेष लक्ष लागलं आहे.
अशी सुरू झाली परंपरा : देशात इंग्रजांची राजवट होती. त्यावेळी आपला राग व्यक्त करण्यासाठी तसंच क्रांतिकारकांच्या समर्थनार्थ बडगे काढण्यास सुरुवात झाली ती अजून सुरू आहे. साधारणपणे टीकात्मक व उपहासात्मक बडगे काढण्याची परंपरा आहे. पण एकदोन बडगे समर्थनात निघू शकतात. ही परंपरा आजही कायम आहे.
बडगे म्हणजे काय : बडगे म्हणजे काय हा प्रश्न प्रत्येकाला पडणे स्वाभाविक आहे. तर त्याची माहिती अशी आहे की, भोसले राजघराण्यातील बाकाबाईने इंग्रजांसोबत हात मिळवणी केली. तिच्या कृत्याचा निषेध म्हणून काळी मारबत काढली जाते. बाकाबाईच्या या कृत्याची माहिती असताना देखील तिच्या नवऱ्याने तिच्या कृत्याला विरोध केला नाही. म्हणून त्याचाही पुतळा काढला जातो, त्याला बडग्या असं म्हंटलं जातं. गेल्या १४३ वर्षांपासून काळ्या मारबती सोबतचं बडग्यांची देखील मिरवणूक काढली जाते. यामध्ये वर्षभरात घडलेल्या विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि इतर विषयांना अनुसरून भाष्य करणारे स्लोगन बडग्यांवर लिहून त्यांची मिरवणूक काढली जाते.
यावर्षी हे बडगे ठरू शकतात लक्षवेधक : यावर्षी बडगे तयार करण्यासाठी अनेक विषय दिसत आहेत. त्यात जी-२० परिषदेत भारताला मिळालेलं यश, चंद्रयान-२ या विषयांवरचे बडगे समर्थनार्थ निघू शकतात. याशिवाय महागाई, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, पाकिस्तानचा निषेध करणारे बडगे, दहशतवाद विषयावरील बडगे, राज्य व केंद्र सरकारचे कान टोचणारे बडगे निघू शकतात.
आरक्षणाच्या विषयावर बडगा निघेल का : सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहेत. त्यावरून राजकीय पुढाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. यावर नागपूरकर जनतेच्या मनात नेमकं काय आहे ते एखाद्या बडग्याच्या स्वरूपात व्यक्त होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक विषयांवरील बडगे : दरवर्षी नागपूरच्या काही स्थानिक समस्यांकडे लक्ष वेधून घेणारे बडगे चर्चेत असतात. नागपूर महानगरपालिकेच्या संपूर्ण कारभारावर ताशेरे ओढणारे बडगे बघायला मिळतात. यंदा देखील ती शक्यता नाकारता येत नाही. स्मार्ट सिटी, रस्ते, खड्डे यावर नागपूरकर रोष व्यक्त करू शकतात.
नागपूर मेट्रोने पिलरवर रेखाटला इतिहास : बडग्या-मारबत उत्सवाला व्यापक स्वरूप असे प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागपूर मेट्रोकडून मेट्रोच्या काही पिलर्सवर नागपूरच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे दृश्य साकारले आहेत. त्यात बडग्या-मारबत उत्सवाचा देखील समावेश आहे.
हेही वाचा -