नागपूर Maratha Vs Kunbi : राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा विरुद्ध कुणबी असा वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर कुणबी समुदाय आक्रमक झाला आहे. याबाबत मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्यास कुणबी समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळं या विरोधात आता कुणबी समाजानं आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कालपासून सर्वशाखीय कुणबी समाजासह ओबीसी महासंघ, समविचारी संघटनांच्या वतीनं बैठका घेण्याचं सत्र सुरू आहे.
मराठा विरुद्ध कुणबी वाद पेटणार : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाविरुद्ध सर्वशाखीय कुणबी समाजानं पत्रकार परिषद घेऊन उद्यापासून आंदोलनाला सुरवात करण्याचं म्हटलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका मांडली आहे. नागपूरच्या संविधान चौकात रविवारपासून सकाळी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी सर्व शाखीय कुणबी, ओ.बी.सी आंदोलन कृती समिती तयार करण्यात आलीय. यामध्ये सर्व कुणबी, ओ.बी.सी. संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आंदोलन पूर्णतः निष्पक्ष, असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय.
कुणबी समाज रस्त्यावर उतरणार : या संदर्भात आज सर्व कुणबी समाज प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कुणबी नेते उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्यात येणाऱ्या मराठा समाजाला तीव्र विरोध करण्यात आलाय. सरकारनं असं कोणतेही पाऊल उचलल्यास कुणबी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. तसंच न्यायालयीन लढाई लढण्यासाठी देखील आम्ही तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच : ‘सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन समिती महाराष्ट्र राज्य’ या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनासाठी ज्येष्ठ नेते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मार्गदर्शक समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच कृती समिती स्थापन करून आंदोलन करण्यात येणार असल्याचंही ठरलं आहे. याशिवाय सरकारकडून ठोस, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केलं जाणार : आंदोलन काळात समाजातील लोक गावोगावी, तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनजागरण करणार आहेत. यानंतर पुढील परिस्थिती पाहून जिल्हा पातळीवर भव्य मोर्चा काढला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात ही चळवळ नेऊन विदर्भ स्तरावर या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला. आंदोलनासाठी कोणत्याही राजकीय नेत्यांकडून आर्थिक मदत घेतली जाणार नाही, समाज बांधवांकडून निधी गोळा करून आंदोलन करण्यात येणार असल्याचं आंदोलन समितीकडून सांगण्यात आलंय.
काय आहेत प्रमुख मागण्या :
- सरकारनं मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये.
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये.
- परराज्यातील कुणालाही कागदपत्राच्या आधारे महाराष्ट्रातील जात प्रमाणपत्र देऊ नये.
- जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
- 52 टक्के ओबीसी समाजाच्या लोकसंख्याच्या नुसार 52 टक्के आरक्षण द्यावे.
- केंद्र सरकारनं 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी.
हेही वाचा -
- Maratha Reservation : ...तर दुसरं मणिपूर महाराष्ट्रात होईल, सरकारनं योग्य भूमिका घ्यावी ; ओबीसी जनमोर्चाचा इशारा
- Maratha Reservation : जरांगे पाटलांनी आंदोलन मागं घ्यावं, सरकारची शिष्टमंडळाकडं विनंती
- Congress Leader Join Shiv Sena : राजस्थानात शिंदेच्या गळाला लागला मोठा मासा, कॉंग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश