नागपूर - मराठा आरक्षणाने न्यायालयात तग धरल्यानंतर नागपुरातील जनतेने जल्लोष केला. मराठा आंदोलनाचे केंद्र असलेल्या सक्करदार येथील राजे रघुजी भोसले यांच्या प्रतिमेसमोर मराठा समाजातील नागरिकांनी जल्लोष केला. यावेळी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण देऊ केले होते. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध अनेक संघटना न्यायालयात गेल्यानंतर मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवले आहे. १६ टक्के शक्य नसले तरी, नोकरी आणि शिक्षणात १२ ते १३ टक्के आरक्षण मराठा समाजाला देता येवू शकते, असा निर्णय न्यायालयाने दिला.
राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. गायकवाड समितीने दिलेल्या अहनालानुसार मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्या मागासलेला असल्याच्या आधारावर आरक्षण देता येवू शकते, असा निर्णय दिला. न्यायालयाचा निर्णय येताच मराठा समाजातील नागरिकांनी जोरादार जल्लोष साजरा केला.