नागपूर - वाढत्या शहरीकरणाबरोबर नागपुरात गुन्हेगारी पाय रोवत असल्याचे समोर आले आहे. खून, हल्ले, दरोडे आणि बलात्काराच्या घटनांबरोबरच आता लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे अनेक प्रकार उघडकीला आले आहेत. लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती तयार करुन त्या पोर्नोग्राफीशी संबंधित संकेतस्थळांवर आणि समाज माध्यमांवर टाकल्याचे पाच वेगवेगळे गुन्हे नागपुरात दाखल झाले आहेत.
नागपूर पोलीस विभागाला 'नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रेन' या संस्थेकडून चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने त्याचा तपास सुरू केला होता. तपासाअंती या सर्व चित्रफिती नागपुरातील नंदनवन, जरीपटका, सक्करदरा आणि गणेशपेठ परिसरातून संकेत स्थळांवर अपलोड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा - तुकाराम मुंढेंच्या एका निर्णयामुळे आयुक्त विरुद्ध नगरसेवक रंगणार सामना
त्यांनतर संबंधित आयपी अॅड्रेसचा शोध घेत आरोपींविरोधात हे गुन्हे नोंदवण्यात आले. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही. मात्र, यातून शहरात पोर्नोग्राफीचे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करून सर्व आरोपींना आणि त्यांना मदत करणाऱयांना शोधले जाईल, अशी ग्वाही नागपूरच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिली.