नागपूर - शहरातील पचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमाल चौक परिसरात एका इसमाचा खून करण्यात आल्याने खळबळ मजली आहे. गुड्डू तिवारी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संपत्तीच्या वादातून गुड्डू यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती समजताच पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. खून प्रकरणात पोलिसांनी दोन संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्यांची नावं पिंटू किल्लेदार आणि विवेक गोडबोले असल्याची माहिती पुढे आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत गुड्डू आरोपी पिंटू आणि विवेक हे तिघेही प्रॉपर्टी डिलिंगचे काम करतात. प्रॉपर्टी डिलिंगच्या कामातून मिळालेल्या पैशाच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे बोलले जाते आहे. गेल्या काही दिवसांपासून या विषयावरून वादावादी सुरू होती. त्यातच आज पुन्हा वाद उफाळून आल्यानंतर पिंटू आणि विवेक यांनी गुड्डूवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. ज्यामध्ये गुड्डूचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.