नागपूर - नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालिम होणार आहे. देशातल्या सर्व राज्यांमध्ये आज (ता. २) हा ड्राय रन पार पडणार आहे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या चार जिल्हात या ड्राय रनची तालिम होणार आहे.
नागपुरात तीन ठिकाणी ड्राय रन
नागपूर शहरात आज (ता. २) तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी माहिती दिली. प्रत्येक केंद्राकरिता २५ लोकांची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यांना प्रत्यक्षात लसीकरण करण्यात येणार नाही. प्रत्येक केंद्रावर चार वॅक्सिनेशन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. लसीकरणाच्या ड्राय रन संदर्भात प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली. नागपूर शहरात तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. शहरात डागा हॉस्पिटल आणि के. टी. नगर प्राथमिक आरोग्य केंद्राची या करिता निवड करण्यात आली आहे. तर नागपूरच्या शेजारी असलेल्या कामठी रुग्णालयातसुद्धा ड्राय रनची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे, जालना आणि नंदुरबारमध्येही ड्राय रन
नागपूर प्रमाणेच राज्यात पुणे, जालना आणि नंदुरबारमध्येही आज कोरोना लस देण्याचे ड्राय रन घेण्यात येणार आहेत. त्याची पुर्ण तयारीही झाली आहे. पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय येथे ड्राय रन होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा गृह जिल्हा जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ड्राय रन होणार आहे. आदिवासी बहूल नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे.
२५ जणांना लसीकरण -
ड्राय रनसाठी एका जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणी प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही, मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील.
सीरमच्या कोरोना लसीला सशर्त मान्यता
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात येणाऱ्या 'कोविशिल्ड' या कोरोनावरील लसीला भारतात परवानगी मिळाली आहे. शुक्रवारी भारताचे औषध महानियंत्रक कार्यालयातील अधिकारी आणि कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. भारतात लसीला परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाला लवकरच सुरूवात होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अस्त्राझेनेका कंपनीशी सहकार्य करत सीरमने कोविशिल्ड लस तयार केली आहे.
दरम्यान, भारतामध्ये २०२० या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर मार्च महिन्यापासून महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन करण्यात आला. जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे कामही सुरु झाले. आता जगातील अनेक देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. भारतात आज नव्या वर्षाच्या सुरूवातीला लसीकरणाचा ड्राय रन राबवला जात आहे.
हेही वाचा - स्पेसवूड फर्निचर कंपनीला लागलेल्या आगीत दोनशे कोटींचे नुकसान
हेही वाचा - वाघिण आणि दोन शावकांचा विषप्रयोगामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज; उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना