नागपूर : नागपूर जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. प्रतिष्ठेच्या रामटेक बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुनील केदार - आशिष जयस्वाल युतीचा सुपडा साफ झाला आहे, तर पारशिवनी आणि कुही - मांडळची बाजार समिती सुनील केदार यांना कायम राखण्यात यश मिळाले आहे.
रामटेकच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष : नागपूर जिल्हातील रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण इथे काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली होती. येथे सुनील केदार यांना वगळून काँग्रेसचा तिसरा गट तयार झाला होता. त्या शेतकरी सहकारी पॅनलचे 14 उमेदवार तर भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आणि काँग्रेस गज्जू यादव यांच्या शेतकरी विकास सहकारी सहकारी पॅनलचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. तर पारशिवनी बाजार समिती निवडणूकीत महाविकास आघाडीचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच कुही - मांडळ बाजार समितीत देखील 18 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
सावनेर बाजार समिती बिनविरोध : सुनील केदार यांचे प्राबल्य असलेली सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध झाली होती. सावनेर येथील सर्वच 18 पैकी 18 जागा केदार गटाने बिनविरोध जिंकल्या. त्यामुळे सावनेर बाजार समितीवर केदार गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर माजी मंत्री आणि आमदार सुनील केदार यांचा दबदबा आहे. ते या वेळी सुद्धा आपले वर्चस्व कायम ठेवतील का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज जाहीर झालेल्या निकालात सुनील केदार यांना ग्रामीण भागावर आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळाले आहे.
'या निवडणुकीचा विधानसभेशी संबंध नाही' : या निकालावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'बाजार समिती निवडणुकीत पक्षीय राजकारणात होत नाही. यात सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक लढवतात. भाजप सेनेला काही ठिकाणी यश मिळाले आहे तर काही ठिकाणी स्थानिकां यश मिळाले आहे. काही लोक महाविकास आघाडीलाही यश मिळाले आहे. या निवडणुकीचा विधानसभेशी काही संबंध नाही. या निवडणुका वेगळ्या आहेत. ही कुठलीही लिटमस टेस्ट वैगरे नाही. पहिल्यांदा सहकार खात्यात भाजप सेनेला लढण्याची संधी मिळाली. नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडले आहे. गोंदियाच्या जिल्हापरिषदेत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीची वज्रमुठ सैल का सुटली याचे आत्मपरीक्षण करावे. बाजार समिती निवडणुकीत पक्षीय राजकारण होत नाही', असे ते म्हणाले.