नागपूर - लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) रवींद्र थोडगे यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) सकाळी ११ वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रवींद्र थोडगे हे सैन्यदलातील अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम या सन्मानाचे मानकरी होते. १९९९ साली झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या कारगिल युद्धात लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे यांच्या नेतृत्वातच सियाचीन भागातील बटालियनने महत्वाची भूमिका बजावली होती.
सातारा येथील सैनिक शाळेचे माजी विद्यार्थी व नॅशनल डिफेन्स अकादमीतून अधिकारी म्हणून रवींद्र थोडगे भारतीय सैन्य दलात रुजू झाले. त्यांनी सैन्यदलात अनेक महत्त्वाची पदे भूषविली. सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते काही काळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर नेमण्यात आलेल्या प्रशासक मंडळावरही होते. ते विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापकही होते.
दरम्यान, रवींद्र थोडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन, मुले व मोठा आप्तपरिवार आहे.
हेही वाचा - मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने 13 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
हेही वाचा - विदर्भात सरासरी १०० टक्के पावसाची नोंद; गोंदिया, यवतमाळ, अकोल्यात टक्केवारी घटली