नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ११ तारखेला होणार आहे. प्रचाराच्या तोफा अवघ्या काही तासानंतर थांबणार असल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे. त्यातल्या त्यात आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात अनेक नेत्यांची तब्बल दोन पेक्षा जास्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. आजचा रविवार पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यासह बहुजन रिपब्लिकन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचाराने अक्षरशः रान उठविले आहे.
आघाडीच्या आज होणाऱ्या सभा -
आज नागपुरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जून खर्गे यांची पहिली जाहीर सभा नागपूर जिल्ह्याच्या उमरेड येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर ते दिवसभर विदर्भातील विविध भागात जाहीर सभांना संबोधित करतील. संध्याकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नागपुरात २ ठिकाणी जाहीर सभा आयोजण करण्यात आले आहे. ज्यामध्ये काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचा प्रचार करतील त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण देखील आज नागपूरसह विदर्भात प्रचार करणार आहेत. सकाळी ते गडचिरोली येथे नामदेव उसेंडी यांच्या प्रचारात सहभागी होतील. त्यानंतर वर्धा येथील काँग्रेसचे उमेदवार चारुलता टोकस यांचाही प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण वर्धात सभा घेणार आहेत. आज शेवटच्या टप्प्यात ते नागपुरात नाना पटोले यांचा देखील प्रचार करणार आहेत.
युतीच्या आज होणाऱ्या सभा -
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचाराकरिता कळमेश्वर आणि कन्हान येथे २ जाहीर सभा घेणार आहेत. आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या जाहीरनाम्याचेही प्रकाशन केले जाणार आहे. तर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय विदर्भ निर्माण महामंडळचे उमेदवार सुरेश माने यांच्या प्रचारार्थ विदर्भवादी नेते आणि राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हे देखील प्रचारात सहभागी होणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा रविवार शेवटचा असल्याने, कोणत्याही पक्षाने मतदारांपर्यंत पोहोचण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही.