नागपूर - आयटी पार्क परिसरातील गायत्री नगर येथे नरेंद्र चकोले यांच्या घरातील बाथरूममध्ये शुक्रवारी सकाळी 9.45 च्या दरम्यान बिबट आढळून आला होता. त्यानंतर सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या गोंधळात तो बिबट येथून फरार झाला होता. त्यानंतर वनविभागातर्फे शोधमोहीस सुरू करण्यात आली. अखेर हा बिबट आज मध्यरात्री 2.30 वाजेच्या दरम्यान आयटीपार्क परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
बिबट्याला पकडण्यासाठी 20 ट्रॅप कॅमेरे -
शोधमोहीमेदरम्यान याच परिसरातील नागरिक किशोर जगताप यांच्या घरावरून उडी मारून जाताना या बिबटाच्या पायाचे ठसे उमटले होते. त्यानुसार राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण प्रतिष्ठानच्या या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, बिबट्या त्यानंतर कोणाला दिसून आला नाही. या बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात साधारण 20 ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले होते. परंतु बिबटच्या उपस्थितीचे कोणतेही पुरावे मिळत नव्हते. शनिवारी अडीच वाजताच्या सुमारास हा बिबट 'ट्रस्ट' या सॉफ्टवेअर कंपनीच्या परिसरात असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना दिसून आला. याची माहिती साहायक उप वनसंरक्षक सुनील काळे यांना देण्यात आली. त्यानंतर या सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये हा बिबट दिसून आला.
बिबट अंबाझरी बायोडायव्हर्सिटीतून आल्याचा अंदाज -
हा बिबट दिसून आला त्या ठिकाणापासून काही अंतरावर अंबाझरी बायोडायव्हर्सिटी हा 700 एकराचा परिसर आहे. याच परिसरातून हा कुत्र्यांच्या मागे लागून हा बिबट आला असावा, असा अंदाज आहे. यासोबतच सध्या लॉकडाऊन असल्याने रस्त्यानवर वर्दळ नसे किंवा पूर्णतः रिकामे असणे असेही घडले आहे. यामुळे या भागात येणे सहज शक्य झाले असावे, अशी शक्यता हिंगण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांनी सांगितले.
हेही वाचा - नवीन सोशल मीडिया कायदा: ट्विटरने नोडल अधिकारी म्हणून सरकारला दिला वकिलाचा संपर्क