नागपूर - खरीप हंगाम जवळ आला असून यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आढावा घेतला. नागपूर विभागात खरीप हंगामात 19.35 लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात येणार आहे. यासोबत विदर्भातील प्रमुख पीक असलेले सोयाबीनची उगवण क्षमता तपासूनच लागवड करण्याचेही आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
खरीप हंगामात 19.35 लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात येणार
खरीप हंगामाचे अनुषंगाने नियोजन तसेच खते व बियाण्यांच्या उपलब्धतेबाबतचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. विभागात खरीप हंगामात 19.35 लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात येणार आहे. यासोबत शासनाने यावर्षी कमी दिवसाच्या पीक पद्धतीचा अवलंब करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाण्यांची उपलब्धता करण्यासंदर्भात यावेळी निर्देश देण्यात आले.
निंबोळी अर्क आदी जैविक खतांचा वापर वाढविण्याला प्राधान्य
विभागात खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करुन त्याऐवजी निंबोळी अर्क आदी जैविक खतांचा वापर वाढविण्याला प्राधान्य देण्यात येत असून सरासरी दहा टक्के रासायनिक खत कमी करण्यासोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टीने धान व सोयाबीनची पेरणी करताना पट्टा पद्धतीचा वापर करणे, कापूस कापसाची लागवड, बीबीएस पद्धतीने करणे तसेच किड रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्यात. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 1 लाख 61 हजार क्विंटलची मागणी असून पुरवठ्याचे नियंत्रित करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
5 लाख 43 हजार 313 हेक्टर सिंचन साध्य झाले
खरीप हंगामासाठी 2020-21 या वर्षासाठी एकूण 5 लाख 86 हजार 406 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत एकूण 5 लाख 43 हजार 313 हेक्टर सिंचन साध्य झाले आहे. यावर्षी खरीपासाठी 4 लाख 32 हजार 055 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. नगप विभागात खरीप सिंचनाच्या 10 मोठे प्रकल्प, 51 मध्यम व 336 लघु असे एकूण 397 प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रचलित पीक पद्धतीत बदल करणे, सगुणा पद्धतीने धान पिकांची लागवड करणे, पाणी वापर काटकसरीने करणे याबाबत गावांमध्ये जावून जागृती करण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता गवळी यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील खरीप आढावा घेण्यात आला. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, सामान्य उपायुक्त श्रीकांत फडके, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता उत्तम पवार, अधीक्षक अभियंता ज. ग. गवळी, कृषी सहसंचालक प्रज्ञा गोडघाटे तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.