नागपूर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या जयेश कांथाचे उर्फ पुजारीने चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पीएफआयवर बंदी येऊ शकते, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी का येऊ शकत नाही, याच राागतून त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यामुळे जयेश पुजारी उर्फ शाकीरने नितीन गडकरी यांना खंडणीची धमकी दिल्याचा खुलासा केला आहे. जयेश उर्फ शाकीरने केलेल्या या धक्कादायक खुलाशामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
धर्मपरिवर्तनानंतर जयेशचा झाला शाकीर : जयेश पुजारी हा कुख्यात गुंड बंगळुरुच्या कारागृहात कैद होता. यावेळी त्याचा अनेक कुख्यात गुंडासोबत संपर्क आला. जयेश पुजारीने धर्म परिवर्तन केल्यानंतर तो जयेश पुजारीचा शाकीर झाला. जयेश पुजारी उर्फ शाकीरने धमकी देण्यासाठी नितीन गडकरी यांचीच निवड का केली, याबाबतचा खुलासा पोलिसांनी त्याच्याकडून जाणून घेतला. यावेळी त्याने पीएफआयवर बंदी घातली, तर तशीच बंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही घालता येऊ शकते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांची निवड धमकी देण्यासाठी केल्याची माहिती त्याने दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
धर्म परिवर्तनानंतर धर्मासाठी तो झाला कट्टरवादी : धर्मपरिवर्तननंतर जयेश कांथा उर्फ पुजारी हा शाकीर म्हणून आपली ओळख निर्माण करत होता. धर्मासाठी तो कट्टरवादी झाला. महत्वाचे म्हणजे 'पीएफआय' अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात तो होता. त्यांनी जयेशच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत प्रचंड विष पेरले होते. त्यामुळे जयेश गेली अनेक वर्ष अस्वस्थ झाला होता. म्हणूनच तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वतःचा शत्रू मानत होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते दृढ आहेत. या बद्दल त्याला माहिती असल्याने म्हणून त्याने धमकी आणि खंडणी मागण्यासाठी नितीन गडकरी यांची निवड केल्याची कबुली नागपूर पोलिसांना दिली आहे.
'पीएफआय'च्या संपर्कात जयेश : जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध दहशतवादी संघटनांसोबत असल्याने नागपूर पोलिसांनी त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पीएफआय नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचा सचिव मोहम्मद अफसर पाशाच्या संपर्कात होता. त्यानंतर आणखी एका कट्टरवादी पदाधिकऱ्यांच्या तो संपर्कात असल्याची माहिती तपासात पुढे आली असून त्यांनी जयेशचा ब्रेन वॉश केल्याचे उघड झाले आहे.
खंडणी प्रकरणाचा तपास एनआयएकडे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी व खंडणी प्रकरणात नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला अटक केली आहे. सध्या जयेश हा नागपूर कारागृहात आहे. चौकशीदरम्यान त्याने अनेक नेत्यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. संवेदनशील प्रकरण असल्याने हा तपास एनआयएकडून सुरू करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी उपमहानिरीक्षक व अधीक्षक दर्जा असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी गुरुवारी सात तास प्रकरणाशी संबंधित नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
बंदद्वार केली चौकशी : चौकशी सुरू असताना आत कोणीही येऊ नये म्हणून सात तास बंदद्वार विचारपूस करण्यात आली. संबंधित दस्तऐवजांची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. जयेश पुजारी बद्दल एनआयएच्या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. तापस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयए आता तपासाची दिशा ठरविणार आहे. चौकशीनंतर दोन्ही अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.
जयेश पुजारीला बेळगाव कारागृहातून अटक : याप्रकरणी नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी या कुख्यात गुंडाला बेळगाव कारागृहातून अटक केली होती. बेळगाव कारागृहातूनच केलेल्या फोनचा सुगावा मिळाल्यानंतर ही अटक करण्यात आली. नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश पुजारीचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याबाबतचे महत्त्वाचे धागेदोर मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा -
Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरण; एनआयए अधिकारी नागपुरात दाखल
Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींना खंडणी मागणारा अटकेत; 'ही' महत्वाची माहिती समोर
Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरण, NIA च्या अधिकाऱ्यांनी केली 7 तास चौकशी