नागपूर - कोरोनामुळे शाळेची दारे बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे लक्षात आल्याने नागपूरच्या नूतन महाविद्यालयाने एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे. झोपडपट्टी भागांत जिथे मोबाईल आणि त्यासाठी रिचार्ज नसणे यासारख्या अडचणी आहेत. त्यावर मात करण्यासाठी शिक्षकांची ही धडपड सुरू आहे.
विद्यार्थ्यांसाठी 'शाळा आपल्या दारी' उपक्रम -
कोरोनामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून शाळा जवळपास बंद आहे. याचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पडतो आहे. ऑनलाईन शिकवणीच्या माध्यमातून जरी शाळा सुरु असल्या तरी अनेक कुटुंबात एकच मोबाईल आहे, तो ही साधा. मोलमजुरी करणाऱ्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या कुटुंबाकडे तर अँड्रॉईड मोबाईल सुद्धा नाही. एखाद्याकडे असला, तर त्याचा रिचार्ज कुठून करावा, हा प्रश्नच आहे. यामुळे जरीं ऑनलाईच्या माध्यमातून शाळा सुरू असल्या तरी झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलांच्या अडचणी वेगळ्या आहेत. विशेष म्हणजे याच अडचणी लक्षात घेऊन नागपूरच्या नूतन भारत विद्यालयातील शिक्षकांनी 'शाळा आपल्या दारी' हा उपक्रम सूरु केला आहे. यात शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे चीज होतांना दिसून येत आहे.
मागील महिन्याभरात बदलले चित्र -
पहिल्या दुसऱ्या वर्गात शिकणारी मुले इंग्रजीत पाढे म्हणत आहेत. तर आठव्या वर्गात शिकणारी मुले कधी भूगोलाचा तरी कधी इतिहासाचा अभ्यास करत आहेत. लहान मुले गणिताची आकडेमोड करत आहेत. पण आज दिसत असलेले हे चित्र काही दिवसांपूर्वी नव्हते. शाळा बंद असल्याने मुलांनी अभ्यास बंद केला होता. काही मुले आई वडिलांसोबत कामावर जात होती. तर लहान मुले गावात खेळण्यात गुंग होती. मागील दीड वर्षात असलेले हे चित्र बदलवण्यासाठी शिक्षकाना प्रचंड मेहनत आणि कष्ट घ्यावे लागले. शिक्षणापासून दुरावलेली ही मुले आता कुठे पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वंदना बडवाईक सांगत आहेत.
मुलांना मोफत शिकण्याची संधी -
मुले शाळा आपल्या दारी या उपक्रमामुळे फक्त भारत प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांनाच फायदा होत आहे, असे नाही. ज्या शाळांनी फिस नाही भरली म्हणून ऑनलाईन क्लास बंद केले, ते मुले असो की इतर कुठलेही. त्या भागात राहणाऱ्या सर्व मुलांना या खुल्या वर्गात बसून शिक्षणाचे धडे गिरवण्याची संधी आहे. ज्ञानदान करणे हे शिक्षकांचे खरे कर्तव्य आहे. तो आमच्या शाळेचा नाही म्हणून शिकवणार नसेल तर तो शिक्षक नाहीच, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापाक डॉ. वंदना बडवाईक यांनी दिली.
शहरातील आठ भागात सुरु आहे उपक्रम -
शाळा आपल्या दारी हा उपक्रम शहरातील आठ झोपडपट्टी वस्त्यांमध्ये राबविला जात आहे. यामध्ये भीमनगर, वैशाली नगर, एकात्मता नगर, गणेश नगर, जयताळा, दाते ले आउट, नारायण नगर, या भागातही शिक्षक हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमा मुळे पालक खुश आहेत. दिवसभर धिंगाणा मस्ती करणारी मुले शिक्षण घेत आहेत. हा लहान मुलांचा अभ्यास पालकांना आनंद देणारा असतो, असे वैशाली बोपुलकर यांनी सांगितले.
मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येतील -
शाळा बंद आहेत. अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू आहेत. हे कारण नूतन भारताच्या शिक्षकांना देता आले असते. पण उद्या मुले जेव्हा पुन्हा शाळेत येईल, तेव्हा शैक्षणिक गुणवता खालावलेली आणि शिक्षणापासून कोसो सुरू गेली असेल. पण नूतन महाविद्याल्याने जो पुढाकार घेतला. तोच पुढाकार इतरांनी घेतला, तर नक्कीच यामुळे शिक्षणापासून वंचित राहणारी मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होईल, यात शंका नाही.
हेही वाचा - ईडीचा वापर करून केंद्र सरकारकडून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न - शरद पवार