नागपूर - शुक्रवारी दिवसभरात नागपूर शहरात १४७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारपासून नागपुरात रॅपिड टेस्टिंगला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे शहरातील विविध भागांमधील आहेत. तब्बल १४७ नवीन रुग्णांची भर पडल्याने नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार १७९ इतकी झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रशासनाने आधीच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर २० कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत.
नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ४३० इतकी झाली आहे. नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. सध्या नागपुरात ७१५ सक्रिय रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथे उपचार सुरू आहेत. नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर १.५६ टक्के इतका झाला आहे.