नागपूर - जिल्ह्यात सातत्याने कोरोनाची वाढ होत असताना आज (शुक्रवारी) कोरोना बाधितांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. दिवसभरात 6 हजार 461 नवीन बाधित रुग्ण आढळले तर 7 हजार 294 जणांनी कोरोनावर मात केली आहे. नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
नागपूर जिल्ह्यात 22 हजार 876 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 6 हजार 461 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये शहरी भागातील 3649 तर ग्रामीण भागातील 2802 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज 88 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागातील 39 तर ग्रामीण भागातील 39 जणांचा समावेश आहे. तर जिल्हाबाहेरील 10 जणांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. यासोबतच आज 7 हजार 294 जण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरमध्ये गुरुवारच्या तुलनेत घट होऊन 921 सक्रिय रुग्ण कमी झाले असून त्यांची संख्या 76 हजार 706 वर आली आहे.
पूर्व विदर्भात मृत्यू आणि बाधितांच्या संख्येत घट
शुक्रवारी पूर्व विदर्भात 11 हजार 286 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 11 हजार 139 जण कोरोना मुक्त झाले आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मिळून 166 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाधितांच्या तुलनेत आणि मृत्यू ससंख्येत सहा जिल्ह्यात घट दिसून आली आहे.