नागपूर - पूर्व विदर्भात येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे संकट आणखी मोठे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर विभागाच्या ६ जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु धरणात सरासरी ८ टक्केच पाणी साठा शिलक राहिला आहे. ज्यामुळे पाणी संकट आणखी वाढणार असल्याने नागपूरसह पूर्व विदर्भाला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागेल.
पाणीदार विदर्भ पाणी टंचाईच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याने प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसू लागले आहेत. पाणी टंचाईमुळे पूर्व विदर्भात पाण्याचा हाहाकार माजेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशावेळी सिंचन विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या ६ जिल्ह्यांत मोठे - १८ प्रकल्प, माध्यम - ४० तर लघु प्रकल्प ३१४ आहेत. मोठ्या धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा, मध्यम धरणात १४ टक्के, तर लहान धरणात ११ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पात सरासरी साधारणतः ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन सिंचन विभाग करत आहे. जून महिन्यात पाऊस आला नाही तर पाण्यासाठी वणवण होणे निश्चित असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटू लागले आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा अर्ध्यावर आला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आला नाही. तर पूर्व विदर्भात पाण्यासाठी हाहाकार होईल. त्यामुळे जनतेनेसुद्धा आत्ताच पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.