नागपूर - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने ( 75 Years of Independence ) नागपूर शहरातील नागरिकांना स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सैनिकांची माहिती मिळावी, या उद्देशाने नागपूर महानगर पालिकेकडून शहिदांच्या घरापुढे शहीद (हुतात्मा) असे नमूद असलेले गौरव नामफलक लावण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ( Honor Plate at Freedom Fighters Home ) या उपक्रमाच्या माध्यमातून हुतात्मा व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे, नागपूरकरांना वीरमरण आलेल्यांचे कर्तृत्त्व कळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो आहे.
नागपूर महानगर पालिके तर्फे प्रशासन स्वातंत्र्य सैनिकांचा दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा माध्यमातून नागपूर शहरातील तब्बल 301 स्वातंत्र्य सैनिकांचा घरी भेट देऊन घरासमोर नामफलक लावण्यात येत आहे. या भेटी दरम्यान स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदाना बद्दल मनपा तर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. 17 वर्षीय हुतात्मा शंकरराव महाले यांच्या घरापासून हा उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा कुटुंबियांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
वीरमरण आलेले शंकरराव महाले यांची प्रेरणादायी गाथा-
हुतात्मा शंकरराव महाले यांनी १९४२च्या भारत छोडो आंदोलनात इंग्रज सरकारच्या विरोधात भाग घेतला होता. त्यांचे वडील दाजीबाजी महाले यांना या आंदोलनात गोळी लागली होती. त्या विरोधात नागरिकांनी नवाबपुराच्या पोलीस चौकीमध्ये आग लावली होती. या आंदोलनाचे नेतृत्त्व हुतात्मा शंकर महाले यांनी केले होते. त्याविरोधात इंग्रजांनी त्यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यावेळी शंकरराव केवळ १६ वर्षाचे होते. पुढे दोन वर्ष त्यांना कारागृहात ठेवून नंतर फाशी देण्यात आली.
स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनात देशात सर्वात कमी वयात शंकरराव महाले यांनी देशासाठी प्राण अर्पण केले. फाशीची शिक्षा होण्यापूर्वी आईची भेट झाली तेव्हा रडत असणाऱ्या आईची शंकररावांनी समजून काढताना सांगितले होते की, ‘मी तुमच्या पोटी पुन्हा जन्म घेईन.’ शंकरराव महाले यांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा गांधी सुद्धा होत्या, असे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले. लाल किल्ल्यावर सुद्धा शंकर महाले यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे.
हेही वाचा - 75 Years of Independence : भारत मातेचे वीर सुपूत्र बटुकेश्वर दत्त यांची कहाणी
महापौरांची संकल्पना -
नागपुर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व अर्पण करणाऱ्या नागपूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापुढे नामफलक लावण्यात येत आहे.