नागपूर - औरंगाबाद येथे गुन्हेगारांसोबत फोटो काढल्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या चर्चेत आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकाही केली. अनिल देशमुख यांनी आता यावर स्पष्टीकरण दिले आहे.
यापुढे दक्षता घेणार -
दोन दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनेकांनी त्यांच्या सोबत फोटो काढून घेतले. त्यामध्ये काही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींनी देखील देशमुख यांच्या सोबत फोटो काढले. हे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. त्यानंतर विरोधकांनी या मुद्द्याला धरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले आहेत की मी औरंगाबाद दौऱ्यावर गेलो होतो, त्यावेळी हजारो लोक मला भेटायला आणि निवेदन देण्यासाठी आले होते. भेटण्यासाठी येणारी व्यक्ती कोण आहे आणि त्याचा पूर्व इतिहास व व्यवसाय कोणता आहेत या संदर्भात माहिती नसते. मात्र, पुढील काळात या संदर्भात काळजी घेणार असल्याचे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले.
काय आहे प्रकरण -
गृहमंत्री अनिल देशमुख हे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी तीन व्यक्तींनी त्यांच्या सोबत फोटो काढले. ज्यांनी फोटो काढून घेतले, त्यापैकी एकावर ५०० ट्रक चोरून त्यांचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे. तर दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. अन्य एकावर बलात्कारा सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा - गृहमंत्री अनिल देशमुखांचा 'तो' फोटो वादाच्या भोवऱ्यात