नागपूर : होळीची धुळवड (रंगपंचमी) साजरी करताना सर्वाधिक मागणी असते ती म्हणजे गुलाल रंगाची. गुलाल रंग फारसा हानिकारक नसतो, त्यामुळे सर्वांची पहिली पसंती असते ती म्हणजे गुलालला. पण, हा गुलाल कश्याने तयार होतो हे मात्र, फारश्या लोकांना अजूनही माहीत नाही, त्यामुळे आज आपण गुलाल गुलाल कसा तयार होतो, हे बघणार आहोत. नागपूर येथील वाथोडा नंदनवन भागात राहणारे आदमने कुटुंब गेल्या 70 ते 80 वर्षांपासून गुलाल तयार करून विक्रीचा व्यवसाय करत आहे.
यंदा गुलालाची दुप्पट मागणी : उत्सवप्रिय आपल्या भारत देशात होळीच्या धुळवळीला वेगळेच महत्त्व आहे. यावर्षी शंभर टक्के निर्बंधमुक्त होळी साजरी होत असल्यामुळे गुलालाच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. कोरोना मुळे गेल्या दोन वर्षांपासुन नागरिकांना मनसोक्त होळी खेळता आली नाही. यंदा मात्र गुलालाची प्रचंड मागणी बघता, नागरिक जोमाने होळी खेळणार असल्याचे दिसत आहे.
वर्षभर गुलाल तयार केला जातो : रासायनिक रांगांमुळे नुकसान होत असल्याने अनेकांनी ईच्छा नसताना देखील धुळवड खेळने सोडून दिले होते. दिवसेंदिवस सगळेच नागरिक त्वचेची काळजी घ्यायला लागले आहे, त्यामुळे आता होळीत ग्राहकांकडून नैसर्गिक रंगांची मागणी केली जाते, त्यातही आता केवळ गुलालाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आदमने कुटुंबाची आज तिसरी पिढी गुलाल तयार करण्याचे काम करत आहे.
30 टन गुलाल विक्री : गुलाल तयार करणे, आदमने कुटुंबाचा पारंपारिक व्यवसाय आहे. आज तिसरी पिढी या कामात गुंतलेली आहे. यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे गुलालाची मागणी दुप्पटीने वाढली असल्याचं ते सांगतात. गेल्या दोन महिन्यांत तयार केलेला गुलालाची पूर्णपणे विक्री झाली असून; पुन्हा नवीन गुलाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. आत्ता पर्यंत 30 टन गुलाल विक्री झाला असून; आणखी दहा टन गुलाल निर्मिती सुरू झाली आहे.
नैसर्गिक पद्धतीचा अवलंब : होळी असो की निवडणुकीच्या मिरवणूका किंवा निकाल यामध्ये सर्वात जास्त गुलालाची मागणी केली जाते. गुलाल तयार करताना आरारोट (मका पावडर), रंग आणि पाण्याचा उपयोग केला जातो, त्यापासून तयार होणारा गुलाल मुळीच हानिकारक नसल्याचा दावा आदमने कुटुंबियांनी केला आहे. रंग आणि सामान्य किमतीला मिळणाऱ्या गुलाला पेक्षा नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या गुलालची किंमत थोडी जास्त असते, मात्र ग्रहकांची पसंती याच गुलालला असल्याचे दिसत आहे. शिवाय या रंगाने निसर्गाची हानी देखील होत नाही.