नागपूर High Court Grant Bail In Rape Case : अमरावती जिल्ह्यातील अंजनगावात एका अल्पवयीन मुलीचे आरोपीसोबत प्रेमातून शरीर संबंध झाले. मात्र त्यानंतर आरोपीनं बलात्कार केल्याचा गुन्हा मुलीच्या पालकांनी दाखल केला होता. त्याबाबतचा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाला. न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या एकल खंडपीठानं म्हटलंय, "आरोपीनं वासनेनं नाही, तर प्रेमातून शरीर संबंध झाले हे सिद्ध झालं. त्याला संबंधित मुलीची संमती होती, हे तिच्या जबाबातून स्पष्ट होतं. त्यामुळे आरोपीचा जामीन मंजूर करण्यात येत आहे" असा निर्णय दिला.
अभ्यासाला गेली 'ती' परत आलीच नाही : अल्पवयीन मुलगी 23 ऑगस्ट 2020 रोजी तेरा वर्षाची होती. ती आपल्या घरातून मैत्रिणीकडं पुस्तक घेऊन अभ्यासाला जाते म्हणून गेली, परंतु परत आली नाही. तेरा वर्षाची मुलगी घरातून अभ्यास करायला चालली, असं सांगून गेली मात्र परत न आल्यानं अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार केली. पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपी आणि मुलगी हे महाराष्ट्राच्या बाहेर बंगळुरू इथं आढळले. त्यामुळं पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याला कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून तो कोठडीतच आहे. मात्र आरोपीचं म्हणणं होतं की, की संबंधित मुलीचे आणि त्याचे प्रेम संबंध होते. त्यामुळं हा बलात्कार नाही. म्हणून जामीन मिळावा. या संदर्भातील "सर्व तथ्य न्यायालयाच्या पटलावर आल्यामुळं बलात्कार नव्हे, प्रेमसंबंधातून शरीर संबंध झाले, याला आकर्षण आणि वासनेच्या भावनेतून केलेला लैंगिक अत्याचार म्हणता येणार नाही" असं न्यायालयानं आपल्या निर्णयात नमूद केलं आणि आरोपीचा जामीन मंजूर केला.
खोटं कारण सांगून घरातून पळाली मुलगी : आरोपीच्या वतीनं वकिलांनी न्यायालयासमोर मुद्दा मांडला, की "दोघांचे प्रेम संबंध होते. त्यामुळं मुलगी घरातून खोटं कारण सांगून पळून गेली. नंतर ती मुलाबरोबर बंगळुरूला गेली. तसंच पोलिसांना तिने दिलेल्या जबानीमध्ये मुलीनं त्याच्याशी प्रेम संबंध असल्याचं कबूल केलं आहे, पोलिसांनी यासंदर्भातील जबाब कोर्टात दिलेला आहे. 2020 पासून आरोपी हा पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा देखील दाखल झालेला आहे."
बालिकेसोबत शरीर संबंधास मान्यता नाही : "अल्पवयीन तरुणीसोबत करण्यात आलेल्या शरीर संबंधास कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळं सरकारी वकिलांनी अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक संबंधाला तिची संमती कायदेशीर नाही. त्यामुळं आरोपीच्या अर्जावर कोणतीही सहानुभूती दाखवू नये, आरोपीचा जामीन मंजूर करू नये," असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे.
अटी आणि शर्ती आधारे आरोपीचा जामीन मंजूर : न्यायालयानं दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर आपल्या निर्णयात नमूद केलं की, या खटल्यामध्ये आरोपीवर आरोपपत्र दाखल झालं. परंतु त्यानंतर खटल्यात काही प्रगती झाली नाही. ही वस्तुस्थिती जर पाहिली तर, आरोपीचे आणि अल्पवयीन मुलीचे प्रेम संबंध होते, हे सिद्ध होत आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्यास काही हरकत नाही." त्यामुळं काही अटी आणि शर्तीवर त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जामीन मंजूर केला. नियमित संबंधित पोलीस ठाण्यामध्ये आरोपीकडून हजेरी लावावी, यासह इतर अटीवर न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचा :