नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. ही योजना तळागाळाच्या माणसांपर्यत पोहचवून त्यांना सक्षम बनविण्यास मदत करणार आहे. लोकप्रतिनीधींनी आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला.
जबाबदारीने काम करा -
आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून संपूर्ण देश सक्षम होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध शहरात या संकल्पनेचा प्रचार व प्रसार केला जात आहे. नागपुरातही आत्मनिर्भर भारत योजनेला रूजवण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत मार्गदर्शक' कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आत्मनिर्भर संकल्पनेतून दीन-दलित आणि महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सर्व स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. जे बोलतो ते करून दाखवण्याची उर्मी प्रत्येकाने बाळगली पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला.
माझ्या संकल्पना विचारांच्या पलीकडील -
राजकारणात बोलणाऱ्यांची कमी नाही. मात्र, बोलण्यापेक्षा काम करण्यावर माझा विश्वास आहे. मी नेहमी विचारांच्या पलीकडील संकल्पना मांडत असतो. मात्र, माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. किंबहुना ती संकल्पना अनेकांना पटत नाही. गडचिरोली सारख्या भागात बांबूपासून इथेनॉल तयार करून विमानाचे बायोरिफायनरी इंधन तयार करण्याची माझी संकल्पना आहे. येत्या दोन-तीन वर्षात देशातील सगळी विमान सेवा बांबूपासून तयार केलेल्या इथेनॉलवर चालवून दाखवेल, असेही गडकरी म्हणाले.
सेवेचे व विकासाचे राजकारण यातून आत्मनिर्भर भारताची संकल्पना पुढे आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवा, असे मार्गदर्शनही केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले. या कार्यक्रमाला महापौर संदिप जोशी, भाजपा शहराध्यक्ष प्रविन दटके, आमदार गिरिश व्यास यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.