नागपूर - हवामान विभागाने विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला असताना शनिवारी वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यात गारपीटसह पावसाचा फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना दुपारच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील मोर्शी चांदूरबाजार तालुक्यात तर वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीसह पाऊस झाला आहे. यामध्ये गहू, चना, संत्रा, तूर आणि भाजीपाला पिकाचे मोठं नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात संत्र्याचा बहारला गारपीटीचा तडाखा
हवामान खात्याने पूर्व आणि पश्चिम विदर्भात 8 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत पावसासह गारपीट अंदाज व्यक्त केला असताना तो खरा ठरला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यात मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावात गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. गारपिटीमुळे या परिसरातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक गावातील घराचे छप्पर उडून नुकसान झाले आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शिराळा पुसदा राजुरा या गावात गारपिटीने संत्रा पिकाचा बहार गळून पडल्याने संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच, हरभरा आणि भाजीपाला पिक जमीनदोस्त झाले आहे.
वर्धा जिल्ह्यातील संत्रा भाजीपाला पिकाचे नुकसान
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील लाडेगाव, माठोडा बेनोडा तसेच पिंपळखुटा भागात झालेल्या गारपीटीत घर आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाढोणा, गुमगाव गावांमध्ये काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली. काही भागात गारांचा खच साचलेला आहे. यासोबत आष्टी तालुक्यातील खडकी परसोडा अंतोरा गारपीट झाली. कारंजा तालुक्यात सेलगाव ठाणे गाव राजनी या गावात गारपीट झाली असून संत्रा बागा गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुढील तीन दिवसात पूर्व आणि पश्चिम विदर्भात गरपीटीसह पावसाचा अंदाज
उत्तर भारतात पश्चिम विक्षोभ निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम मध्य भारतात दिसणार आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे वाऱ्याची दिशा बदललेली असून उत्तरेकडून येणारे वारा आता दक्षिण पश्चिम आणि दक्षिण पूर्व म्हणजेच बंगालची खाडी आणि अरबी समुद्रातून वाहणार आहे. या बदलाचा परिणाम पश्चिम विदर्भातून पाऊस गारपीट होत पुढे-पुढे जात पूर्व विदर्भातील जिल्ह्यात पाऊस आणि गारपीट होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस हवामान खात्याने थंडी कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक एल.एम साहू यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणूनच गिरीश महाजनांना कोरोनाची लागण'