नागपूर - सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथील एका शाळेतील १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या बातमीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे सर्व विद्यार्थी पाटणसावंगी येथील आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. एवढेच नाही तर, शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. त्यामुळे, सुरक्षेच्या कारणास्तव शाळा पुढील १० दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या १६ विद्यार्थ्यांची आणि मुख्याध्यापिकेची प्रकृती उत्तम आहे.
हेही वाचा - धक्कादायक! पहिल्या टप्यात लस घेतलेले पाच डॉक्टर आढळले कोरोना पॉझिटिव्ह
सावनेर तालुक्यात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली. काल नागपूर जिल्ह्यात एकूण ७५० रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ६०३ रुग्ण हे शहरातील आहेत, तर ४६ रुग्ण हे सावनेर तालुक्यातील आहेत. त्यामुळे, सावनेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होऊ लागल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. त्यातच आता पाटणसावंगीच्या आदर्श विद्यालयात मुख्याध्यापिकेसह १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांची बेफिकरी पडणार भारी
नागपूर जिल्ह्यासह विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आरोग्य यंत्रणांना वाटत असली, तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र कोरोनाची भीती वाटत नसल्याचे दिसत आहे. पंधरवड्यापूर्वी दोनशे ते अडीचशेपर्यंत असलेला कोरोनाबाधितांचा आलेख या आठवड्यात दररोज पाचशेच्या घरात जात असताना काल ७५० रुग्णांची नोंद झाली. यामुळे महापालिका प्रशासनासह आरोग्य यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - केंद्रीय अर्थसंकल्प देशाला अर्थशक्तीकडे घेऊन जाणार- सुरेश प्रभू