नागपूर - बकऱ्या चारायला गेलेल्या ६० वर्षीय गुरख्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ही घटना नागपुरच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा शिवारात घडली आहे. अब्दुल वहाब शेटे (वय, ६०) असे मृतकाचे नाव असून तो स्वतःच्या मालकीच्या आणि इतर गोपालकांच्या बकऱ्या चारायला गेला असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला, त्याचवेळी वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
अब्दुल वहाब शेटे नेहमीप्रमाणे बकऱ्या घेऊन कोतेवाडा शिवारातील केशवराव आष्टनकर यांच्या शेतात गेले होते. नेमके त्याचवेळी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस सुरु झाला. त्यामुळे ते झाडाच्या खाली स्वतःचा बचाव करण्यासाठी गेले असताना त्याच्याशेजारी वीज पडली. यात अब्दुल यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.