नागपूर : रिद्धी घरात खेळत असताना तिला डास चावू नये, म्हणून तिच्या पालकांनी डास पळवणारी मशीन सुरू केली. चौधरी कुटुंबातील सदस्य कामात व्यस्त झाल्यानंतर काही वेळाने रिद्धीने मशीनच्या लिक्विडची बाटली हाती घेतली. नकळत ती बाटली तोंडात टाकल्यामुळे बाटलीतील लिक्विड काही प्रमाणात तिच्या पोटात गेले, त्यामुळे रिद्धीला अस्वस्थ वाटू लागले होते. रिद्धीच्या पालकांनी तिला लागलीच उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले होते. मात्र काही वेळातच उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पालकांनी सतर्क राहावे : डासांची संख्या वाढली की डास पळवणारी मशीन घरोघरी 24 तास सुरू असते. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास अडचण होते. शिवाय इतर त्रास सहन करावा लागतो. हे मशीन आणि त्याचे लिक्विड लहान मुलांपासून दूर ठेवावे असे वारंवार सांगितले जात असले तरी निष्काळजीपणा कुणाच्या जीवावर बेतू शकतो, हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीडमधील घटना : बीड जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजीने चप्पल घेतली नाही म्हणून दहा वर्षीय चिमुकल्याने 13 फेब्रुवारीला दुपारी आत्महत्या केली होती. तो मामाच्या गावात शिक्षण घेत होता. युवराज श्रीमंत मोरे वय 10 वर्ष (रा. बोडखा कासारी) ता. माजलगाव असे या आत्महत्या केलेल्या लहान बालकाचे नाव होते. या मुलाच्या मृत्युने गावावर शोककळा पसरली होती. आत्महत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेह धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता. शवच्छेदन करण्यात आले होते.
काय आहे आत्महत्या मागचे कारण : या मुलाचे आई-वडील आपली इतर पोटाची खळगी भरण्यासाठी व संसाराचा गाडा पुढे चालवण्यासाठी, वडील श्रीमंत मोरे हे आपल्या मेहुण्याजवळ त्यांचा मुलगा युवराज याला ठेवून गेले होते. कारण मुलांना शिकावे, मोठे व्हावे व स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. या मुलाचे आई-वडील ऊसतोडणी मजूर होते. त्यामुळे आपल्या मुलाला आजीजवळ शिक्षणासाठी सोडून गेले होते. त्या मुलाने आपल्या आजीकडे चप्पल घेण्याची मागणी केली होती. मात्र घरात आर्थिक अडचण असल्याने आजीने चप्पल घेण्यास नकार दिला होता. याचाच राग त्याने मनात ठेवून आत्महत्या केली होती.
हेही वाचा : Hearing On Shiv Sena : मेल पाठवून अविश्वास प्रस्ताव आणणे चुकीचे-कपिल सिब्बल