नागपूर - सलग दुसऱ्या दिवशी नागपूरच्या रेल्वे स्टेशनवरून आरपीएफच्या जवानांनी गांजाची मोठी खेप पकडली आहे. गांजाची तस्करी करणारे आरोपी आजही सापडलेले नाहीत. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन ४५ ते ५० किलो इतके असून त्याचे बाजार मूल्य ५ लाख रुपये आहे.
होळीचा सण जवळ येताच गांजाची मागणी देखील वाढलेली आहे. मागणी वाढल्याने अनेक राज्यातील गांजा तस्कर सुद्धा सक्रिय झाले आहेत. गेल्या २ दिवसात नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर झालेल्या २ कारवाई दरम्यान पकडण्यात आलेल्या ७५ किलो गांजा वरून हे स्पष्ट झाले आहे.
बुधवारी दक्षिण एक्सप्रेसच्या सामान्य बोगीतून २५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आज आरपीएफ जवान गस्तीवर असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या इटारसी एन्डच्या दिशेने ३ मोठ्या बॅग बेवारस पडलेल्या असल्याचे आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आले.
बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये गांजाची पाकिटे आढळून आलीत. त्यानंतर लगेचच या संदर्भात सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ३ बॅग मध्ये १५ पाकिटे असून त्यामध्ये ४५ ते ५० किलो गांजा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरपीएफ ने जप्त केलेला गांजा पुढील कारवाईसाठी जीआरपीएफकडे सोपवला आहे.