नागपूर - शुक्रवारी नागपूर शहरात चार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर दहा रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या नागपूरात ८१ अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून नागपूर शहरातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
नागपुरातील कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा या भागातुन कोरोनाबाधित रुग्ण पुढे येण्याचा वेग मंदावला असला तरी गड्डीगोदाम या नवीन कोरोना हॉटस्पॉटमधून रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी आढळलेल्या चार पैकी दोन रुग्ण गड्डीगोदाम भागातील आहेत, तर एक मोमीनपुरा आणि बजेरिया परिसरातील आहे. नव्याने सापडलेल्या चार रुग्णांमुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४१० झाली आहे.
शुक्रवारी नागपुरातील दहा रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. यामध्ये मोमीनपुरा, बाबा फरीद नगरसह चंद्रपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. नागपुरातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२२ झाली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त रूग्ण डिस्चार्ज होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागपूरला लॉकडाऊनमध्ये सूट मिळू शकते.