नागपूर - देशात ईडीचा वापर कसा करायचा, कोणाला धमकवण्यासाठी करायचा, ही बाब आता नवीन राहिलेली नाही. मागील सहा वर्षात जनतेला आणि व्यावसायिकांना भाजप सरकारची ही परंपरा माहिती झाली आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. बांधकाम व्यावसायिक व्यावसायिक अविनाश भोसले यांची होत असलेल्या ईडी चौकशीच्या प्रश्नावर पटोले यांनी उत्तर दिले.
भाजपचे राष्ट्रप्रेम नकली -
भाजपच्या नकली राष्ट्रप्रेमात जे लोक नसतील, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सातत्याने सर्व शहरात सुरू आहे. अविनाश भोसलेंवर ईडीची कारवाई सुरू झाली आहे. याचे मला आश्चर्य वाटले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ईडीचा नावाने धमकवण्याचे काम झाले आहे, असेही पटोले म्हणाले.
मोदींच्या रडण्याचे कौतुक नाही -
पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान राज्यसभेत बोलले आणि रडले. कारण त्यांना भर सभागृहात बोलण्याची सवय नाही. त्यांना सभागृहाबाहेक 'मन की बात' आणि पैसे देऊन गोळा केलेल्या लोकांच्या सभेत बोलण्याची सवय आहे. त्यामुळे ते सभागृहात रडले यात काही विशेष नाही, असा टोला नाना पटोले यांनी मोदींना लगावला.
राज्याचे राज्यपाल संविधानिक पदावर आहेत. लोकांच्या भावना आणि संविधान व्यवस्थेचा त्यांच्या लक्षात येत नसले तर हे चुकीचे आहे. ते नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर चालणार असतील तर त्या विरोधात न्याय मागण्याची भूमिका काँग्रेसची असणार आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयातही जावू, असे नाना पटोले म्हणाले.