नागपूर - गेल्या चार दिवसांपासून नागपूरच्या विविध भागांमध्ये बिबट्याचा वावर दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल (दि. 31 मे) बिबट्या महाराज बाग शेजारी असलेल्या नाल्यावरील फुलावर बसलेला आढळला. तेव्हापासून वन विभागाच्या पथकाने महाराज बाग परिसरात आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच आज (दि. 1 जून) सकाळी बिबट्याने डुकराची शिकार केल्याचे निष्पन्न झाल्याने वन विभागाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आले आहेत. महाराज बाग शेजारच्या सर्व परिसरांमध्ये आज बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक सुरेंद्र काळे यांनी दिली आहे. बिबट्याला त्याच्या मूळ अधिवासात सुरक्षितपणे जाता यावे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले आहेत.
चार दिवसांपूर्वी बिबट गायत्री नगर परिसरातील एनपीटीआय वसाहतीच्या मागच्या भागात दिसून आला आहे. त्याभागात सलग दोन दिवस शोध मोहीम राबविण्यात आल्यानंतर काल तो बिबट महाराजबाग परिसरातील नाल्याच्या शेजारी असलेल्या नाल्यावरील पुलावर दिसून आला होता. त्यानंतर वन विभागाने त्या भागातही शोध मोहिम राबवली होती. मात्र, आज सकाळी कृषी विभागाच्या परिसरात बिबट्याने डुकराची शिकार केल्याचे निष्पन्न झाल्याने पुन्हा या भागात कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक सुरेंद्र काळे यांनी दिली आहे.
बिबट्याच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य
बिबट्याचा वावर नागरी वस्तीच्या शेजारी आढळून आल्यापासून वनविभाग सातत्याने त्याचा शोध घेत आहे. बिबट्याला सुरक्षित अधिवासात परत जाता यावे. यासाठी तो नाल्यांच्या मार्गाने मार्गक्रमण करत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी तो प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्यासह नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊनच सर्व उपाययोजना केल्या जात असल्याच सहायक वनसंरक्षक सुरेंद्र काळे यांनी सांगितले.
हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोविडविषयी जनजागृती करावी - सुनील केदार