नागपूर - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने ( 75 Years of Independence ) राज्याच्या क्रीडा विभागामार्फत मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर एअरो मॉडलिंग शोचे ( Aero Modeling Show in Nagpur ) आयोजन करण्यात आले. या शोमध्ये छोट्या आकाराचे रिमोट कंट्रोलद्वारे संचालित 20 विमानांच्या हवाई कवायती डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले आहे. पहिल्यांदाच नागपूरात होणाऱ्या या एअर मॉडलिंग शोला ( First Aero Modeling Show Nagpur ) लहान मुलासह नागपुरकर पालकांनीही सहभागी होत प्रतिसाद दिला.
उद्देश्य काय? - विद्यार्थ्यांना हवाई क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींची माहिती व्हावी. हवाई क्षेत्रात करिअर घडवून आकाशामध्ये विमानाप्रमाणे उंच भरारी घ्यावी. तसेच देशाच्या लष्करी सेवा आणि राष्ट्रीय छात्र सेनामध्ये भरती होण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी ‘एअरोमॉडेल शो’चे आयोजन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकारात नागपूरमध्ये करण्यात आले.
आठवीत शिकणारा श्रेयस होता सर्वात छोटा पायलट - राष्ट्रीय छात्र सेनाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. तसेच काही हौशी एअरो मॉडलरही यात सहभागी झाले. यात सर्वात लहान एरोमॉडेलचा पायलट म्हणून श्रेयस पिंपळापुरे यानेही सहभाग घेतला होता. चौथ्या वर्गात असतांना त्याला एअरो मॉडेलची आवड वडील आणि काकापासून घेतली असल्याचे तो सांगतो. आवाजाच्या गतीपेक्षा अधिक गतीने धावणार सुकोई 27 चा भारतीय लढाखु विमानाचा छोटं एअरो मॉडेल त्याने या शोमध्ये उडवले. पुढे एनसीसीच्या माध्यमातुन एनडीएमध्ये जाऊन यातच करियर करण्याचा त्यांचा मानस आहे. खरं म्हणजे या शोमध्ये क्रीडा विभागाला आणि एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, हेच उद्दिष्ट होते.
हेही वाचा - Swiss Open Super 300 Title: पीव्ही सिंधू थायलंडच्या बुसाननला हरवून पहिल्यांदा ठरली स्विस ओपन चॅम्पियन
या शोमध्ये आकर्षण ठरले एअरो मॉडल - या शोमध्ये ग्लायडर, फ्लायिंग सॉसर, मल्टी रोटरसारखे एअरो मॉडेलसह सुखोई एमकेआय, मिराजसारखे भारतीय हवाई दलात प्रामुख्याने वापरले जाणारे विमानांचे छोटे मॉडेल्सचे उड्डाणही झाले. या विमानांना एअरो मॉडलरनी उडवत आपले कौशल्य दाखवले. यात कवायती केल्या तेच काही छोट्या विमानांनी तिरंगा रंग आणि यासोबत त्यामध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' असे फलक घेऊन ते उडवण्यात आले. या मॉडेलच्या कवायती डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. यासोबतच सर्वात अखेरीस राष्ट्रीय छात्र सेनेचा गरुड विमान हे एअरोमोडेलिंग शो होत असलेल्या मैदानाच्या फिरवण्यात आल्याने अनेकांनी पाहण्याचा आनंद लुटला.
कोरोनानंतर विद्यार्थ्यांना मिळालं व्यासपीठ आणि आनंद - दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शालेय विद्यार्थी घरात कोंडून होते. त्यामुळे त्यांना पुन्हा मैदानात आणण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले. राष्ट्रीय छात्र सेनेचेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना भविष्यात सैन्यात जाण्याचे दारही खुली होत आहेत. बालेवाडी येथील क्रीडा विद्यापीठाशी करार करून एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सेनीत भरती होण्यासाठी प्राधान्य मिळाले म्हणून प्रशिक्षण करारसुद्धा करणार असल्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.