नागपूर - नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे ३, तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून ६ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले आहे. रामटेक मतदारसंघातील पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभेसाठी नाम निर्देशन पत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांच्या उपस्थितीत पार पडली. रामटेक लोकसभा मतदारसंघातील अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टीचे उमेदवार खुशबू बेलेकर, अपक्ष उमेदवार आनंदराव खोब्रागडे, अपक्ष उमेदवार मन्सूर जयदेव शेंडे आणि निलेश महादेवराव ढोके, विश्व शक्ती पक्षाचे योगेश रमेश जयस्वाल आणि कृष्णराव निमजे यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोपाल दुमाने, दिपक शेंडे आणि मीना मोडघरे यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. याशिवाय रामटेक लोकसभा मतदारसंघातील पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे छाननीनंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात २०, तर नागपूर लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.